मुंबई :
बीडीडी चाळींना अतिशय गौरवशाली असा इतिहास आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे,आचार्य अत्रे अशा कितीतरी महान व्यक्ती व क्रांतिकारकांचे वास्तव्य या चाळींमध्ये होते.चाळींच्या जागी इमारती उभ्या राहतील पण कष्टकरी माणसाला येथून जाऊ देऊ नका.तुमच्या कष्टाचा ठेवा विकू नका तसेच या भागातील मराठी टक्का कमी करू नका असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वरळी येथील जांबोरी मैदानावर झाला.त्यावेळी ते बोलत होते.बीडीडी चाळींना अतिशय गौरवशाली असा इतिहास आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, आचार्य अत्रे अशा कितीतरी महान व्यक्ती व क्रांतिकारकांचे वास्तव्य या चाळींमध्ये होते. महाराष्ट्राच्या ऐक्याचे येथे दर्शन घडते.अनेक जाती- धर्माचे लोक वर्षानुवर्षे एकत्रितपणे येथे राहत आहेत.अशा या चाळींचा इतिहास आपण जतन केला पाहिजे. या चाळींमध्ये घरासोबतच लोकांना अन्य सुविधाही दिल्या पाहिजेत. चाळींच्या जागी इमारती उभ्या राहतील पण कष्टकरी माणसाला येथून जाऊ देऊ नका. तुमच्या कष्टाचा ठेवा विकू नका तसेच या भागातील मराठी टक्का कमी करू नका असेही पवार यांनी सांगितले.
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे,असे म्हणणाऱ्या लोकमान्य टिळकांनी क्रांतीची मशाल पेटवली. पण आज या स्वराज्यामध्ये सर्वसामान्य जनतेला त्यांचे हक्काचे घर देण्याचे आव्हान आम्ही स्वीकारले असून त्यांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.बीडीडी चाळीचा एक मोठा इतिहास आहे. या चाळींनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ पाहिली, महाराष्ट्रासाठी रस्त्यावर सांडलेले रक्त पाहिले. वासुदेव बळवंत फडके यांच्यासारखे क्रांतिकारक देखील या चाळींमधील राहिले. बटाट्याची चाळ या पुस्तकातून पु. ल. देशपांडे यांनी चाळीच्या जीवनाचे सुंदर वर्णन केलं आहे. अनेक क्रांतिकारी चळवळी आणि मुंबईच्या सामाजिक, राजकीय तसेच सांस्कृतिक जडणघडणीत चाळींचा व त्यातील कष्टकऱ्यांचा मोठा वाटा आहे. त्या लोकांचे फार मोठे योगदान मुंबईच्या विकासात राहिले आहे .आपण कितीही मजली इमारत आणि टॉवर्स या ठिकाणी बांधले तरी या चाळींच्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकणार नाही असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांपैकी अनेकांचे वास्तव्य या मुंबईच्या चाळींमध्ये होते.या हुतात्म्यांची आपण नेहमी आठवण ठेवली पाहिजे. उद्या चाळीतून तुम्ही टॉवरमध्ये जरी गेलात तरी आपली संस्कृतीची नाळ तुटू देऊ नका, अख्खे आयुष्य आपण याठिकाणी जगला आहात, हे घर तुमचे स्वतःचे आहे, त्यामुळे कोणत्याही मोहात पडू नका आणि मराठी पाळंमुळांना धक्का लावू देऊ नका असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.