भारतीय वायुदलाला फ्रान्सकडून मिळाली दोन मिराज-2000 लढाऊ विमाने.

0

नवी दिल्ली :

सीमेवरील तणावाच्या पृष्ठभूमीवर भारतीय वायुदलाला दोन मिराज-2000 लढाऊ विमाने फ्रान्सकडून मिळाली असून, ती ग्वाल्हेर येथील वायुदलतळावर दाखल झाली आहेत.

प्रशिक्षण श्रेणीतील दोन जुनी मिराज विमाने भारताला मिळाली आहेत. फ्रान्स वायुदलाच्या संरक्षणात उड्डाण घेतलेली ही विमाने ग्वाल्हेर येथील वायुतळावर दाखल झाली, अशी माहिती सरकारी सूत्राने दिली. वायुदल मिराजच्या ताफ्यातील विमानांची संख्या 50 करण्याच्या प्रयत्नात असून, त्याचाच एक भाग म्हणून ही दोन विमाने विकत घेण्यात आली आहेत.

वायुदलाने वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये 51 मिराज विमाने मिळवली असून, या माध्यमातून तीन स्क्वाड्रन तयार करण्यात आल्या आहेत. ही सर्व विमाने ग्वाल्हेर वायुतळावर तैनात करण्यात आली आहेत. देशातील 51 मिराज विमानांचे आधुनिकीकरण करून त्यांची क्षमता वाढवण्यासाठी भारताने फ्रान्ससोबत करार केला आहे.

अपघातांमुळे काही मिराज विमाने नष्ट झाल्याने आधुनिकीकरणासाठी मागवण्यात आलेली काही उपकरणे शिल्लक आहेत, अशी माहिती सूत्राने दिली. हीच उपकरणे खरेदी करण्यात आलेल्या दोन मिराज विमानांसाठी वापरली जाणार असून, कारवायांसाठी ती सज्ज केली जाणार आहेत, असे सूत्राने सांगितले.

See also  इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी 'नॉन-एक्झामिनेशन रुट' चा पर्याय, सक्रिय तपासणी व्हावी : वर्षा गायकवाड