हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचे काम सात दिवसात सूरु न झाल्यास आंदोलन करणार : खासदार गिरीश बापट

0

पुणे :

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचे काम सात दिवसात चालू झाले नाही तर भारतीय जनता पार्टीच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा खासदार गिरीश बापट यांनी आज दिला.या संदर्भातील निवेदन बापट यांनी ‘पीएमआरडीए’चे महानगर आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांना आज दिले.

पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ सुहास दिवसे यांची भेट घेऊन खासदार बापट यांनी त्यांना निवेदन दिले. यावेळी त्यांच्यासोबत शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्यासह या भागातील पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

हिंजवडी येथील आयटी पार्क, पुणे व पिंपरी चिंचवड शहराला जोडणाऱ्या हिंजवडी ते शिवाजीनगर प्रस्तावित मेट्रो मार्गाचे काम गेले अनेक वर्षे प्रलंबित असल्याने हा मार्ग नियोजित वेळेत पूर्ण होणे शक्य नाही. प्राधिकरणाकडून यावर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जात आहे. सदर मेट्रो नियोजित वेळेत पूर्ण न झाल्यास भविष्यकाळात त्यावर अतिरिक्त खर्च करावा लागेल ही शक्यता नाकारता येत नाही, असे खासदार बापट यांनी निवेदनात म्हटले आहे.

कामाचा कालावधी वाढता तर त्याचा नकळत आर्थिक भार पुणेकर जनतेला व सरकारला सोसावा लागणार आहे, ही बाब नक्कीच गंभीर आहे. सदर मार्ग सुरु होण्यास विलंब होत असल्यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीचा प्रश्न नित्याचा झालेला आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक त्रासाचा सामना करावा लागत आहे, असे बापट यांनी निवेदनात नमूद केले आहे.

पुणे-पिंपरी-चिंचवड मधील नागरिक व आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या असंख्य कर्मचाऱ्यांना वाहतूक कोंडीच्या त्रासातून सुटका देणारा असल्यामुळे सदर मार्गावर ज्या ९८ % जागा ताब्यात आलेल्या आहेत, त्या ठिकाणी तातडीने काम सुरू करावे, तसेच ज्या उर्वरित शासनाच्या जागा ताब्यात आलेल्या नाही, त्या ताब्यात घेणेबाबत प्रशासनाने लक्ष देऊन कार्यवाही करावी. जेणे करुन सदरचा प्रस्तावित मेट्रो मार्ग नियोजित वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल, असे खासदार बापट यांनी निवेदनात म्हटले आहे.

See also  पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने समन्वय समिती केली जाहीर