यावर्षी देखील महापौर चषक स्पर्धेला महापालिकेच्या वित्तीय समितीचा नकार

0

पुणे :

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी महापौर चषक स्पर्धा रद्द करण्यात आली होती. यंदाही महापौर चषक स्पर्धेला महापालिकेच्या वित्तीय समितीने नकार दिला आहे. त्यामुळे या स्पर्धेवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे.

महापालिका ही स्पर्धा दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात आयोजित करते. या स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, यासाठी पालिकेकडून खेळाडूंना अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. स्पर्धेसाठी महापालिकेकडून सात ते आठ कोटी रुपये खर्च केले जातात. यामध्ये १८ ते २० स्पर्धांचे आयोजन केले जाते.

या स्पर्धा खुल्या गटासोबत शालेयस्तरावरदेखील भरवल्या जातात. गेल्या वर्षी राज्यात कोरोनाचे संकट होते. पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त असल्याने महापौर चषक स्पर्धा रद्द केली होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर शहरातील रुग्णांची संख्या कमी होत असल्याने लावण्यात आलेले निर्बंध शिथिल केले जात आहेत.

महापालिका प्रशासनाने शाळा, महाविद्यालये, मैदाने, जलतरण तलाव, खुले केले; मात्र या स्पर्धेच्या खर्चाला मान्यता देण्याबाबत वित्तीय समितीने आर्थिक संकटाचे कारण पुढे करत स्पर्धा घेण्यास व त्यासाठी होणाऱ्या खर्चास मान्यता देण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे.

See also  स्वारगेट ते कात्रज बीआरटी मार्ग एक जानेवारी पासून सुरू होणार.