पुणे :
सातारा रस्त्यावरील स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्ग १ जानेवारीपासून सुरू करण्यात येईल, अशी घोषणा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी केली. बीआरटी मार्गातील बहुतांश त्रुटी दूर झाल्या असून किरकोळ कामे येत्या तीन ते चार दिवसांत पूर्ण होतील, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्गाची पुनर्रचना करण्यात येत आहे. पुनर्रचनेतील बहुतांश कामे पूर्ण झाली असून येत्या ३१ डिसेंबर पर्यंत उर्वरित किरकोळ कामे पूर्ण करण्याची सूचना महापौर मोहोळ यांनी केली. तांत्रिक प्रक्रिया आणि विविध कारणांमुळे कामे रखडली मात्र त्यातील त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत, असेही पाहणी दरम्यान सांगितले. या पाहणी प्रसंगी उपमहापौर सरस्वती शेंडगे, काँग्रेस गटनेता आबा बागुल, नगरसेवक श्रीनाथ भिमाले, राजेंद्र शिळीमकर, प्रवीण चोरबेले, गोपाळ चिंतल यांच्यासह आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप, पथ विभाग प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी, विद्युत विभाग प्रमुख श्रीनिवास बोनाला उपस्थित होते.
स्वारगेट-कात्रज बीआरटी मार्गाच्या कामाची निविदा २०१६ मध्ये काढण्यात आली. मात्र तांत्रिक अडचणी आल्यामुळे २०१८ मध्ये नव्याने ही प्रक्रिया राबविण्यात आली. निवडणूक आचारसंहिता, रस्त्यावरील प्रमुख दोन उड्डाणपुलांची कामे यामुळे बीआरटी मार्गाच्या कामांना विलंब झाला. जानेवारीपासून बीआरटी मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे, असे महापौर मोहोळ यांनी सांगितले.