पुणे महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान आणि बोनस जाहीर : महापौर मुरलीधर मोहोळ

0

पुणे :

पुणे मनपातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच माध्यमिक, तांत्रिक शिक्षण आणि पुणे मनपा शिक्षण मंडळातील शिक्षक, शिक्षकेतर सेवकांना २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच आर्थिक वर्षांकरिता सानुग्रह अनुदान आणि जादा रक्कम मिळण्याबाबत पुणे मनपा कामगार युनियनशी करार केला असून सानुग्रह अनुदान दिवाळीपूर्वी दोन आठवडे देण्यात येणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

पुणे महापालिकेत सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत हा निर्णत घेण्यात आला असून दिवाळीपूर्वी दोन आठवडे सामुग्रह अनुदानापोटी यंदाच्या वर्षी प्रत्येकी १७ हजार रुपये कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत.

महापौर मोहोळ पुढे म्हणाले, ‘सानुग्रह अनुदानापोटी पुढील पाच वर्षे देण्यात येणारी रक्कम निश्चित करण्यात आली असून ती अनुक्रमे १७ हजार, १९ हजार, २१ हजार, २३ हजार आणि २५ हजार इतकी असणार आहे. विशेष म्हणजे कोरोना काळामध्ये बालवाडी शिक्षिका सेविकांनी दिलेल्या योगदानाची नोंद घेऊन त्या सेवकांना, सर्व शिक्षा अभियानामध्ये काम करणाऱ्या एकूण ६६ कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित मनपा सेवकांप्रमाणे सानुग्रह अनुदान पूर्ण देण्यात येणार आहे.

‘विशेष बाब म्हणून शिक्षण विभाग (प्राथमिक) कडील एकूण ९६ शिपाई (रोजंदारी) सेवकांना यंदाच्या वर्षी कोरोना काळातील कामकाजामुळे १७४ दिवस भरत असल्याने त्यांना वरीलप्रमाणे सानुग्रह अनुदानाचे फायदे अदा करण्यात येणार आहे’, असेही महापौर मोहोळ म्हणाले.

‘कोरोना विषाणू प्रदुर्भावाच्या काळात पुणे मनपातील सेवकांना उत्तमरित्या काम केल्याबद्दल बोनस आणि सानुग्रह अनुदान व्यतिरिक्त बक्षीस म्हणून सन २०२१ मध्ये ३०००/- (तीन हजार रुपये) देण्यात येणार आहेत. पुणे शहराचा गाडा हकताना महापालिका कर्मचारी हाही अत्यंत महत्त्वाचा भाग असून त्यांना न्याय देण्याच्या भूमिकेत आम्ही आहोत. तसेच त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करताना निश्चितच समाधान आहे’.

See also  टॉवर लाईनमध्ये तांत्रिक बिघाडामुळे पुणे ग्रामीण काही भाग, पुणे शहर व पिंपरी चिंचवड भागात वीजपुरवठा विस्कळीत