आयपीएल सूरू, चेन्नई सुपरकिंग्सने मुंबई इंडियन्सला हरविले

0

दुबईः

कोरोना व्यत्ययानंतर आयपीएल २०२१च्या उर्वरित मॅच आजपासून (रविवार १९ सप्टेंबर २०२१) सुरू झाल्या आणि चेन्नईने विजयाने श्रीगणेशा केला. चेन्नई सुपरकिंग्सने मुंबई इंडियन्स विरुद्धची मॅच २० धावांनी जिंकली.

टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या चेन्नईने २० ओव्हरमध्ये ६ बाद १५६ धावा केल्या तर मुंबईने २० ओव्हरमध्ये ८ बाद १३६ धावा केल्या. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने नाबाद ८८ धावा केल्या. यात ९ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. रविंद्र जडेजाने २६, ड्वेन ब्राव्होने २३, सुरेश रैनाने ४, एम एस धोनीने ३, शार्दुल ठाकूरने नाबाद १ धाव अशी कामगिरी केली. फाफ डू प्लेसिस आणि मोईन अली हे दोघे शून्यावर बाद झाले तर अंबाती रायुडू शून्य धावा करुन दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला. तो पुन्हा फलंदाजीसाठी आला नाही. मुंबईकडून अॅडम मिल्ने, जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

मुंबई इंडियन्सकडून सौरभ तिवारीने नाबाद ५० धावा केल्या. याआधी सलामीला आलेल्या क्विंटन डी कॉकने १७ आणि अनमोलप्रीत सिंहने १६ धावा केल्या. सुर्यकुमार यादवने ३, ईशान किशनने ११, कायरन पोलार्डने १५ धावा केल्या. धावचीत झालेल्या कृणाल पांड्याने चार धावा केल्या. ॲडम मिल्नेने १५ धावा केल्या. राहुल चाहरने शून्य धावा केल्या. बुमराह एक धाव करुन नाबाद राहिला. चेन्नईकडून ड्वेन ब्राव्होने तीन तर दीपक चहरने दोन विकेट घेतल्या. शार्दुल ठाकूर आणि जोश हेझलवूडने प्रत्येकी एक विकेट घेतली.

https://twitter.com/IPL/status/1439654120613371905?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1439654120613371905%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

गुडख्याच्या दुखापतीमुळे रोहित शर्मा चेन्नई विरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचे नेतृत्व करण्यासाठी मैदानात उतरला नव्हता. मुंबईचे नेतृत्व कायरन पोलार्डने केले. हार्दिक पांड्याही चेन्नई विरुद्धच्या मॅचमध्ये खेळणार नसल्याची माहिती त्याने टॉसच्या वेळी दिली पण पांड्याच्या न खेळण्याचे कारण त्याने सांगितले नाही.

बुमराहचा अनोखा विक्रम

मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहने चेन्नई विरुद्धच्या मॅचमध्ये मैदानात येताच अनोखा विक्रम केला. बुमराह आज मुंबईकडून शंभरावी आयपीएल मॅच खेळला. आयपीएलमध्ये एकाच टीमकडून १०० किंवा त्यापेक्षा जास्त मॅच खेळणाऱ्यांच्या यादीत त्याचा समावेश झाला. या यादीत बुमराहसह मुंबई इंडियन्सचे तीन खेळाडू आहेत. आरसीबीचा कॅप्टन विराट कोहली या यादीत पहिल्या स्थानावर आहे. त्याने आरसीबीकडून आतापर्यंत १९९ मॅच खेळल्या आहेत. दुसऱ्या स्थानी मुंबई इंडियन्सचा व्हाइस कॅप्टन कायरन पोलार्ड आहे. त्याने मुंबईकडून १७१ मॅच खेळल्या आहेत. या यादीमध्ये तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर अनुक्रमे सुनील नरीन (कोलकाता नाईट रायडर्स) व लसिथ मलिंगा (मुंबई इंडियन्स) हे असून त्यांनी अनुक्रमे १२४ व १२२ सामने खेळले आहेत. आता या यादीमध्ये बुमराहचा समावेश झाला आहे.

See also  पहिल्यांदाच होणार खेलरत्न पुरस्काराने 11 खेळाडूंचा सन्मान

चेन्नई नंबर वन

आजच्या मॅचनंतर बारा पॉइंटसह चेन्नई पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्स बारा पॉइंटसह दुसऱ्या स्थानी आहे. आरसीबी दहा पॉइंटसह तिसऱ्या स्थानी तर आठ पॉइंटसह मुंबई इंडियन्स चौथ्या स्थानी आहे. प्रत्येकी सहा पॉइंटसह राजस्थान रॉयल्स पाचव्या स्थानी आणि पंजाब किंग्स सहाव्या स्थानी आहे. चार पॉइंटसह कोलकाता नाईट रायडर्स सातव्या तर दोन पॉइंटसह सनरायझर्स हैदराबाद आठव्या स्थानी आहे. उद्या (सोमवार २० सप्टेंबर २०२१) कोलकाता नाईट रायडर्स आणि आरसीबी यांचा सामना आहे.