भारताचा ओव्हलवर पन्नास वर्षांनी ऐतिहासिक कसोटी विजय

0

लंडन :

इंग्लंड विरुद्ध भारत संघात चौथा कसोटी सामना केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर पार पडला. सोमवारी (६ सप्टेंबर) या सामन्याच्या अखेरच्या दिवसाच्या अखेरच्या सत्रापर्यंत रंगतदार झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने १५७ धावांनी विजय मिळवला.

याबरोबरच भारताने ५ सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.

याबरोबरच ओव्हलच्या मैदानातील भारताचा हा केवळ दुसराच विजय ठरला. यापूर्वी भारताने तब्बल ५० वर्षांपूर्वी म्हणजेच १९७१ साली पहिल्यांदाच ओव्हलवर कसोटी विजय मिळवला होता. त्याचबरोबर हा सामना जिंकल्याने भारताने मालिकेतील पराभवही टाळला आहे.

अखेरच्या डावात भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी ३६८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला ९२.२ षटकांत सर्वबाद २१० धावाच करता आल्या.

इंग्लंडकडून हसीब हमीदने सर्वाधिक ६३ धावा केल्या, तर रॉरी बर्न्सने ५० धावा केल्या. याशिवाय कर्णधार जो रुटने ३६ धावांची खेळी केली. मात्र, अन्य कोणालाही भारतीय गोलंदाजांसमोर टिकाव धरता आला नाही. भारताकडून उमेश यादवने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा आणि शार्दुल ठाकूरने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

शेपटाची झुंज अपयशी

इंग्लंडने अखेरच्या सत्रात झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण ८९ व्या षटकात उमेश यादवने क्रेग ओव्हर्टनला १० धावांवर त्रिफळाचीत केले. त्यानंतर ऑली रॉबिन्सनला जेम्स अँडरसनने साथ देण्याचा प्रयत्न केला. पण अँडरसनला उमेशनेच ९३ व्या षटकात यष्टीरक्षक रिषभ पंतकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यामुळे इंग्लंडचा डाव २१० धावांवर संपुष्टात आला.

जडेजा-बुमराह समोर इंग्लंडची फलंदाजी कोलमडली

दुसऱ्या सत्रात जो रुट आणि हमीदने चांगली सुरुवात केली होती. मात्र, ६२ व्या षटकात हमीदला ६३ धावांवर रविंद्र जडेजाने त्रिफळाचीत केले. त्यानंतर ६५ व्या षटकात ऑली पोपला २ धावांवर, तर ६७ व्या षटकात जॉनी बेअरस्टोला शुन्यावर जसप्रीत बुमराहने त्रिफळाचीत करत भारताला सामन्यात पुनरागमन करुन दिले. तसेच लगेचच जडेजाने ६८ व्या षटकात मोईन अलीला शुन्यावर बाद केले.

See also  भारतात होणाऱ्या टी२० विश्वचषक स्पर्धा इतरत्र आयोजित करण्याचाआयसीसीचा विचार

यानंतर मात्र, रुटने ख्रिस वोक्ससह इंग्लंडचा डाव सावरला. या दोघांनी इंग्लंडचा धावफलक हलता ठेवला होता. मात्र, यातवेळी भारतासाठी पुन्हा एकदा शार्दुल ठाकूर मदतीला धावून आला. त्याने ८१ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रुटला ३६ धावांवर त्रिफळाचीत केले. पाठोपाठ ८५ व्या षटकात उमेश यादवने ख्रिस वोक्सला १८ धावांवर बाद केले.