मुंबईत 15 ऑगस्टपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

मुंबई :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई लोकलबाबत मोठी घोषणा केली आहे. येत्या 15 ऑगस्टपासून सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. पण लोकलचा प्रवास करण्यासाठी काही निकष असल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर मुंबई लोकलने प्रवास करण्यासाठी तिकीट किंवा पास कसे मिळवायचं याबाबतही मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे.

रेल्वेचा पास तांत्रिक पद्धतीने डाऊनलोड कसा करायचा, याबाबतची माहिती देखील त्यांनी दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री आठ वाजता जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. यावेळी सर्वसामान्य मुंबईकर यांच्या अत्यंत जवळचा असलेल्या विषयावर त्यांनी भाष्य केलं. त्यांनी लोकल ट्रेन सुरु करण्याबाबत मोठी घोषणा केली. येत्या 15 ऑगस्टपासून सर्वसामान्यांना लोकलचा प्रवास करता येणार आहे. पण त्यासाठी काही निकष आहेत, असं त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांची मुंबई लोकलबाबत मोठी घोषणा

“अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी काही निकष आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाशांना लोकलचा प्रवास करण्यास आपण मान्यता देत आहोत. ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना आपण 15 ऑगस्ट पासून लोकलमधून प्रवास करता येईल”, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

रेल्वे प्रवासासाठी पास कसा मिळवायचा?

“ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी मोबाईल अॅपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करू शकतील. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, असे प्रवासी शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतील”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

“सर्वात महत्वाचं म्हणजे, लोकल प्रवासाच्या या पासेसवर क्यू आर कोड असतील जेणेकरून रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येईल. मी आपणास विनंती करतो, की कुणीही अवैधरित्या, बेकायदेशीररित्या पासेस प्राप्त करून घेऊ नयेत. लसींचे दोन डोसेस घ्यावेत व प्रवास करावा”, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्य जनतेला केलं.

See also  महापालिकेत नगरसेवकांची संख्या वाढणार : मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय