उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा 

0

पुणे :

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता आरोग्य सोयीसुविधा वाढविण्यात येत असून सरकार नागरिकांच्या आरोग्याची सर्वतोपरी काळजी घेत आहे. नागरिकांनीही निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करुन सार्वजनिक स्थळी तसेच पर्यटनस्थळी गर्दी न करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज येथे केले.

पुणे विधानभवनाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जि.प.अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार गिरीष बापट, खासदार ॲङ वंदना चव्हाण, पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे, आमदार ॲड. अशोक पवार, आमदार संग्राम थोपटे, आमदार शरद रणपिसे, आमदार सुनिल कांबळे, आमदार सुनिल शेळके, आमदार संजय जगताप, आमदार अतुल बेनके, आमदार दिलीप मोहिते, आमदार सुनिल टिंगरे, आमदार चेतन तुपे, आमदार सिध्दार्थ शिरोळे, तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, ‘पीएमआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे आदि मान्यवरांसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य सोयीसुविधा वाढविण्यात येत असून सरकार नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहे. नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून निर्बंधाचे काटेकोरपणे पालन करावे. जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्ण वाढीचा दर स्थिर असला तरी या आठवड्यातील निर्बंध पुढील आठवडयात कायम राहतील. ज्या नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांनीही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय राज्य सरकार घेत असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, नियमांचे पालन करुन काही उद्योगधंदे सुरु आहेत. उद्योगपतींनीही त्यांच्या कामगारांच्या लसीकरणाची जबाबदारी घेतली आहे. जिल्ह्यात लसीकरणाचे प्रमाण वाढत असून आवश्यक तेवढा लस पुरवठा होत नाही. तरीही जास्तीत जास्त लस उपलब्ध करण्यात येत आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या पाहता गृहविलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणावर जास्तीत जास्त भर देण्यात यावा, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

See also  मुंबई बंगळूर बाह्यवळण रस्त्याला वेगाला वेसण

यावेळी खासदार गिरीश बापट यांच्यासह आमदार संग्राम थोपटे, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनीही काही सूचना केल्या.

डॉ. सुभाष साळुंके म्हणाले, संस्थात्मक विलगिकरण, टेस्टिंग, सुपर स्प्रेडरचे लसीकरण याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात जिल्ह्यातील कोरोनाचा रुग्णदर, प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, नागरिकांची नमुना तपासणी, बाधित रुग्ण, रुग्णालयीन व्यवस्थापन, लसीकरण सद्यस्थिती, म्युकरमायकोसिसचा रुग्णदर, मृत्युदर, ऑक्सिजन प्लांटची सद्यस्थिती याबाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.

पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार व पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील यांनी महानगरपालिककेच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण स्थितीबाबत व उपाययोजनेबाबत माहिती दिली. बैठकीला विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.