कोरोनावरच्या लसीमुळे कमावल्या जाणाऱ्या नफ्यामुळे जगात ९ नवे अब्जाधीस जन्माला !

0

नवी दिल्ली :

कोरोनाच्या संसर्गाने देशासमोर अभूतपूर्व संकट निर्माण केले आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लागू झाल्याने उद्योग-धंद्यांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे लाखो नागरिकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. मात्र अशा या परिस्थितीत कोरोनावरच्या लसीमुळे कमावल्या जाणाऱ्या नफ्यामुळे जगात ९ नवे अब्जाधीस जन्माला आले आहेत. पीपल्स व्हॅक्सीन अलायन्स या कोरोना लसीसाठी अभियान चालवणाऱ्या सामाजिक संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या गटाने म्हटले आहे की जगासमोर आलेल्या कोरोनाच्या संकटामुळे सर्व लोकसंख्येचे लसीकरण करणे गरजेचे झाले आहे.

त्यामुळे लस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी अब्जावधी रुपयांचा नफा कमावला आहे. त्याचा परिणाम होत जगात नवे अब्जाधीश जन्माला आले आहेत. यात कोरोना लस बनवणाऱ्या मॉडर्ना आणि बायोनटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचादेखील समावेश आहे. या दोघांचीही संपत्ती प्रत्येकी ४ अब्ज डॉलर किंवा त्यापेक्षा जास्त आहे. पीपल्स व्हॅक्सीन अलायन्स ही लोकांना लस उपलब्ध करून देण्यात यावी प्रयत्नशील आहे. या नव्या अब्जाधीशांच्या यादीत मॉडर्नाचे संस्थापक गुंतवणुकदार आणि कंपनीचे चेअरमन, सीईओ यांचा समावेश आहे. यात लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे मॉडर्ना व्हॅक्सीन तयार करण्यासाठी बहुतांश निधी हा करदात्यांच्या पैशातून आला आहे. या यादीत चीनी लस उत्पादक कंपनी कॅनसिनो बायोलॉजिक्सचे तीन सहसंस्थापक आहेत.

जगातील ९ नवे फार्मा अब्जाधीश

या ९ नव्या अब्जाधीशांच्या संपत्तीचे एकत्रित मूल्य १९.३ अब्ज डॉलर इतके प्रचंड आहे. जगातील गरीब देशातील सर्व नागरिकांचे संपूर्ण लसीकरण सहज करता येईल एवढी ही संपत्ती आहे. मात्र प्रत्यक्षात या गरीब देशांना जागतिक कोरोना लस पुरवठ्यातील फक्त ०.२ टक्केच लस पुरवठा झाला आहे. कोरोना लसीचा तुटवडा निर्माण झाल्याचा सर्वात मोठा फटका हा या गरीब देशांना बसला आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या १० टक्के लोकसंख्या या गरीब देशांना फक्त ०.२ टक्के लस पुरवठा झाला आहे. नव्या फार्मा अब्जाधीशांव्यतिरिक्त ८ फार्मा अब्जाधीशांच्या कंपन्यासुद्धा कोरोनाची लस बनवतात. कोरोनाच्या या आरोग्य संकटामुळे या आधीच्या अब्जाधीशांच्या संपत्तीत ३२.२ अब्ज डॉलरची प्रचंड भर पडली आहे. या संपत्तीने भारतातील प्रत्येकाचे लसीकरण पूर्ण होऊ शकेल.

See also  नियमांचे पालन करणे सोडून दिल्याने वाढला कोरोना : डॉ. रणदीप गुलेरिया

गरीब देश संकटात

कोरोनाच्या संकटाला आळा घालण्यासाठी कोरोनाची लस हाच सध्यातरी प्रभावी उपाय आहे. त्यामुळे जगभरातील अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत ज्या औषध निर्माण कंपन्या म्हणजे फार्मा कंपन्या कोरोना लसीचे उत्पादन करतात त्यांच्या नफ्यात जबरदस्त वाढ झाली आहे. त्याचा परिणाम होत या फार्मा कंपन्यांच्या शेअरच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. लस उत्पादनातील या मक्तेदारीमुळे जगातील एकूण लस उत्पादनावर आणि त्याच्या पुरवठ्यावर या फार्मा कंपन्यांचेच नियंत्रण निर्माण झाले आहे. यामुळे त्या घवघवीत नफा कमावत आहेत मात्र गरीब देशांसमोर यामुळे मोठे संकट निर्माण झाले आहे, असे मत पीपल्स व्हॅक्सीन अलायन्सने व्यक्त केले आहे.

श्रीमंत देश फार्मा कंपन्यांच्या पाठीशी

या महिन्याच्या सुरूवातीला अमेरिकेच्या पाठिंब्यावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांनी जागतिक व्यापार संघटनेत एक ठराव मांडला होता. कोरोना लशीसंदर्भात निर्माण झालेल्या या मक्तेदारीला तात्पुरता आळा घालावा आणि कोरोनाच्या लसीवरील पेटंट तात्पुरते बाजूला करावे. जेणेकरून सर्वच कंपन्यांना कोरोनाच्या लसीचे उत्पादन करता येईल, असा हा ठराव होता. या ठरावाला १०० पेक्षा जास्त देशांचा पाठिंबा होता. याशिवाय जगातील १०० राष्ट्रप्रमुख आणि नोबेल विजेत्यांनीदेखील या ठरावाला पाठिंबा दिला आहे. असे असतानाही श्रीमंत देश ज्यात इंग्लंड आणि जर्मनीचा समावेश आहे, कोरोना लसीच्या पुरवठ्याबाबत अडथळे आणत आहेत. फार्मा कंपन्यांच्या हिताला ही श्रीमंत राष्ट्रे जगाच्या हितापेक्षा अधिक प्राधान्य देत आहेत. तर कॅनडा, इटली आणि फ्रान्स हे देश कुंपणावर बसले आहेत.