एफआरपी चा दर साखरेपेक्षा जास्त ; सातारा जिल्ह्यातील साखर कारखाने अडचणीत

0

सातारा :

सातारा जिल्ह्यातील साखर गळिताचा हंगाम धिम्या गतीने सुरू असल्याने आणि अजून मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत गळीत सुरु राहण्याची शक्यता आहे. अद्याप मोठ्या प्रमाणात ऊस गाळपाविना उभा आहे. तोडणी वाहतूक यंत्रणा विस्कळित असल्याने कारखान्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यातच साखरेची किमान आधारभूत किंमत 3100 रुपयांपर्यंत असून, कारखान्यांची एफआरपी त्यापेक्षा जास्त असल्याने ऊस दरावरून कारखाने अडचणीत आले असल्याचे पहावयास मिळत आहेत.

सातारा जिल्ह्यातील 15 साखर कारखान्यांनी 82 लाख 35 हजार 218 मेट्रिक टन उसाचे गाळप करून 91 लाख 13 हजार 795 क्िंवटल साखरेची निर्मिती केली आहे. सातारा जिल्ह्यातील 15 साखर कारखाने गेल्या चार ते पाच महिन्यांपासून उसाचे गाळप करत आहेत. आतापर्यंत सर्व कारखान्यांनी मिळून 82 लाख 35 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. कोरोनामुळे अद्यापही मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक आहे. तोडणी व वाहतूक यंत्रणा विस्कळित असल्याने आता कारखान्यांनी हार्वेस्टरच्या वापरावर भर दिला आहे. यावर्षी साखरेचे सुरवातीचे दर 3400 रुपयांपर्यंत होते. त्यामुळे कारखान्यांना उसाचा दर देण्यात अडचण वाटत नव्हती. पण, आता साखरेचे दर 3100 रुपयांवर आले असून कारखान्यांची एफआरपी 3150 ते 3200 पर्यंत जात आहे. त्यामुळे कारखान्यांना तोटा होत आहे. त्यामुळे कारखान्यांनी केंद्र सरकारकडे साखरेची एमएसपी वाढविण्याची मागणी केली आहे.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत गाळप चालणार आहे. काही लहान कारखान्यांचे गाळप अंतिम टप्प्यात आले आहे. यावर्षी उसाची पळवापळवी झाली नाही. प्रत्येक कारखान्याला त्याच्या कार्यक्षेत्रातील ऊसाचे गाळप करण्याचे नियोजन केले आहे.

सह्याद्री, कृष्णा व रयत कारखान्यांना चांगला उतारा मिळाला. सहकारी साखर कारखान्यांत सह्याद्री’ची आघाडी असून, त्यांना 12.46 टक्के साखर उतारा मिळाला आहे. खासगीमध्ये न्यू फलटण शुगरला 11.92 टक्के साखर उतारा मिळाला आहे. खासगी कारखान्यांनी आतापर्यंत 44 लाख 42 हजार 971 मेट्रिक टन उसाचे गाळप करत 46 लाख 68 हजार 830 क्िंवटल साखरेची निर्मिती केली आहे. त्यांना सरासरी 10.51 टक्के साखर उतारा मिळाला आहे. तर सहकारी साखर कारखान्यांनी 37 लाख 92 हजार 247 मेट्रिक टन उसाचे गाळप करत 44 लाख 44 हजार 965 क्िंवटल साखरेची निर्मिती केली आहे.

See also  ऑक्सिजन एक्सप्रेस विशाखापट्टणमवरुन महाराष्ट्राकडे रवाना

श्रीराम-जवाहर फलटण 11.65, कृष्णा 12.10, किसन वीर भुईंज 8.89, लोकनेते देसाई कारखाना 11.99, सह्याद्री 12.46, अजिंक्यतारा 11.63, रयत अथणी शुगर 12.09, खंडाळा कारखाना 6.29, न्यू फलटण शुगर 11.92, जरंडेश्‍वर शुगर 11.14, जयवंत शुगर 10.85, ग्रीन पॉवर शुगर 11.15, स्वराज इंडिया अ‍ॅग्रो 8.49, शरयू शुगर 9.44, खटाव-माण शुगर 10.85 असा उतारा मिळाला आहे.