पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीने देशात चौथे स्थान पटकावले आहे. तर पुणे स्मार्ट सिटीचा पाचवा क्रमांक आला आहे.

0

पिंपरी चिंचवड :

पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचे राहणीमान व महानगरपालिकेचे कामकाज या दहा निकषांच्या आधारे केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाने देशातील १११ शहरांचे रॅंकिंग गुरुवारी (दि.४) जाहीर केले. त्यात पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीने देशात चौथे स्थान पटकावले आहे. तर पुणे स्मार्ट सिटीचा पाचवा क्रमांक आला आहे.

केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाच्या स्मार्ट सिटी योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश झाला. या योजनेसाठी पिंपळे सौदागर संपूर्ण आणि पिंपळे गुरव, पिंपळे निलख, वाकड व रहाटणी या गावांच्या काही भागचा समावेश करण्यात आला आहे.

योजनेला पाचवे वर्ष सुरू आहे. देशातील १११ शहरांचा स्मार्ट सिटीमध्ये सहभाग आहे. या शहरातील नागरिकांचे राहणीमान आणि महापालिकांचे कामकाज यातील दर्जाबाबत केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाने देशातील स्मार्ट सिटींमध्ये स्पर्धा घेतली होती. गेल्या वर्षी एक फेब्रुवारी ते १५ मार्च या कालावधीत स्पर्धा झाली आहे.

त्याच्या निकालाची घोषणा केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्री हरदीप सिंह पुरी व केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाचे सचिव दुर्गा शंकर मित्रा यांनी गुरुवारी (दि.४) दुपारी साडेबारा वाजता केली. त्यात पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीने देशातील १११ शहरांमध्ये चौथे स्थान पटकाविले आहे. दरम्यान, शहरातील रस्ते, पदपथ, सायकल ट्रॅक सुविधा, कचरा संकलन व प्रक्रिया, जलनि:सारण, पाणीपुरवठा, नागरिकांचा सहभाग, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आदी निकषांचे मूल्यमापन स्मार्ट सिटी रॅंकिंगसाठी करण्यात आले.

‘स्मार्ट सिटी’त टाॅप फाईव्ह या शहरे

स्मार्ट सिटीच्या रॅंकिंगमध्ये इंदूर शहराने (मध्य प्रदेश) प्रथम क्रमांक कायम ठेवला आहे. द्वितीय क्रमांकावर सुरत (गुजरात), तृतीय क्रमांकावर भोपाल (मध्य प्रदेश), चतुर्थ क्रमांकावर पिंपरी-चिंचवड व पाचव्या स्थानावर पुणे शहर आहे.

See also  ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर विजय उत्सव नको.