लॉकडाऊन करायचा का ? जनतेने ठरवावे : मुख्यमंत्री.

0

मुंबईः

राज्यावर गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे संकट पुन्हा एकदा गडद होऊ लागले आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधत असून त्यांनी यावेळी राज्यात दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. कोरोनाचे संकट अजून गंभीर होत असून, राज्यात दुसरी लाट आली की नाही हे लवकरच समजणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आज वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावावर मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संपर्क साधताना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

सद्या लॉकडाऊनची भीती टळली असली तरी नागरिकांनी मास्क वापरणे, हात धुणे, सुरक्षित अंतर पाळणे हे गरजेचे आहे.अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल व नामुष्कीने लॉकडाऊन करावा लागेल, असं भाष्य देखील उद्धव ठाकरेंनी केलं आहे.

सर्व राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रम, आंदोलन, यात्रा यांना राज्यात काही दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तर, ‘पक्ष वाढवू, पण कोरोना नाही, पक्ष वाढवायचा आहे जरुर वाढवा, पण कोरोना नका वाढवू,’ असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी नेत्यांना लगावला आहे.

“कोरोना योद्‌ध्यांनी दिलेल्या बलिदानामुळेच संसर्ग आटोक्‍यात आला होता. मात्र, सगळं सुरू झालं आणि रुग्ण वाढू लागले आहेत. एकीकडे कोविड योद्धांचा सत्कार करायचा आणि दुसरीकडे हे उघडा, ते उघडा असे म्हणत राहायचं, हे योग्य नाही. सुरुवातीच्या काळात रुग्णसंख्या आणि बेड याची संख्या विषम होती. मात्र, सध्याची कोरोनाची पिक पिरीयडसारखी संख्या पाहता सध्याचे बेड अपुरे पडू शकतात,त्यामुळे काही प्रमाणात बंधने घालावी लागतील,” असे ठाकरे यांनी नमूद केले.

राज्यात काही दिवस बंदी असणार आहे. यात मिरवणुका, मोर्चे, आंदोलन, यात्रा आदींचा समावेश असणार आहे. तसेच, लॉकडाउन करायचा का? या प्रश्‍नाचे उत्तर येत्या आठ दिवसांत जनतेकडूनच घेणार आहे.

See also  नंदुबारमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का !

ज्यांना लॉकडाउन हवे असेल ते विना मास्कचे फिरतील आणि ज्यांना लॉकडाउन नको आहेत, ते मास्क घालून सर्व नियमांचे पालन करतील, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनसाठी जनतेलाच आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.