डेटिंग ॲप वरून तरुणांना लुटणारी तरूणी पोलिसांच्या जाळ्यात.

0

पुणे :

डेटिंग अॅपवर ओळख वाढवून तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांना लुटणारी तरुणी स्वतःच पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकली आहे. पुण्यातील या तरुणीला गुन्हे शाखेच्या युनिट ४च्या पोलिसांनी अटक केली आहे. तिने तब्बल १६ तरुणांना लुटल्याचे उघड झाले असून, त्यातील चौघांनीच तक्रार दाखल केली आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणी सायली काळे (वय २७, पुणे) हिने १० डिसेंबर २०२० रोजी रावेत येथील एका तरुणाला त्याच्या घरी येऊन शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. बेशुद्ध झाल्यानंतर तरुणाच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि रोकड असा ८५ हजारांचा ऐवज लुटला. या प्रकरणी देहू रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हे शाखा युनिट चारचे पोलीस या गुन्ह्याचा तपास करत होते. पोलिसांनी या तरुणीला तिचीच गुन्ह्याची पद्धत वापरून अटक केली. काही दिवसांपूर्वी चेन्नईतील तरुणाला अशाच प्रकारे लुटल्याची घटना घडली होती. ज्या डेटिंग अॅपवर तरूण आणि आरोपी तरुणीची ओळख झाली होती, तेथेच पोलिसांनी बनावट प्रोफाइल तयार केले. त्यानंतर तिचा शोध सुरू केला. अखेर तरुणीची माहिती मिळाली. पोलिसांनी तिला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. मात्र, खूप दिवस झाले तरी तरुणीने फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली नाही.

अखेर पोलिसांच्या बनावट प्रोफाइलवरून तिला रिक्वेस्ट पाठवली. त्यातील एका प्रोफाइलची रिक्वेस्ट तिने स्वीकारली. तिच्याशी चॅटिंग केले. भूमकर चौकात तिला तिच्या वेळेनुसार बोलावून घेतले. २६ जानेवारीला तरुणी वाकड येथे आली असता, पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तिची कसून चौकशी केली. ही तीच तरुणी असल्याचे उघड झाल्यानंतर तिला वाकड पोलिसांच्या ताब्यात दिले.

चेन्नईच्या तरुणाला लॉजवर नेऊन लुटले होते

आरोपी तरुणीने काही दिवसांपूर्वी चेन्नईच्या तरुणाला लुटले होते. डेटिंग अॅपवर त्यांची ओळख झाली होती. त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर या तरुणीने त्याला पुण्यात भेटायला बोलावले. एका हॉटेलमध्ये नेले. तेथे तरुणाला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. तो बेशुद्ध झाल्यानंतर त्याच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि रोकड लुटून पोबारा केला होता. वाकड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

See also  राजकारणात देखील एक इन्क्युबेशन सेंटर आवश्यक : उद्धव ठाकरे