प्राथमिक शिक्षकांचे असहकार आंदोलन

0

पुणे :

आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी असहकार आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. राज्य शासनाने संच मान्यता, कंत्राटी पद्धतीने भरती, आधार कार्ड आधारित शिक्षक निश्चिती आदी संबंधित निर्णय रद्द करण्याच्या मागण्यांसाठी शिक्षकांनी हे आंदोलन पुकारले आहे.

पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष नारायण कांबळे यांनी याबाबत माहिती दिली. विद्यार्थी शाळेत दाखल आहे मात्र काही विद्यार्थ्यांचे जन्म तारखेचे प्रमाणपत्र नसल्याने आधार कार्ड निघत नाही. तसेच परराज्यातील विद्यार्थ्यांच्या आधार कार्डसंबंधी अनेक समस्या असतात. आधारकार्ड नसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक संच निर्धारणासाठी व योजनांच्या लाभासाठी ग्राह्य न धरण्याचे शासनाचे धोरण आहे.

अशा प्रकारच्या शासनाच्या धोरणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा बंद पडून विद्यार्थी मोफत व सक्तीच्या शिक्षणापासून वंचित राहतील. याला विरोध म्हणून प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेतील शिक्षक काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करत आहेत. व्हाट्सअपच्या प्रशासकीय ग्रुपमधून बाहेर पडून असहकार आंदोलन करण्यात येत आहे.

शिक्षण हक्क कायद्यामध्ये असणाऱ्या तरतुदीला फाटा देत शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थी संख्या व शिक्षक यांचे प्रमाण रद्द ठरवत विद्यार्थ्यांच्या हिताचा कोणताही विचार न करता खेड्यापाड्यातील वाडी वस्तीवरील गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाची कवाडे कायमस्वरूपी बंद करण्याचा घाट घातला आहे, असा आरोपही नारायण कांबळे यांनी केला आहे.

See also  एसटीच्या चालक, वाहकांना दोन कर्तव्यांमध्ये नऊ तासांची सक्तीची विश्रांती