सगेसोयऱ्यांची तत्काळ अंमलबजावणी करा, अन्यथा विधानसभेत नाव घेऊन पाडू; मनोज जरांगेंचा थेट इशारा

0

अंतरवाली :

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. जालन्यातील अंतरवाली सराटी गावात ते उपोषणाला बसणार आहे. पोलिसांनी मात्र त्यांच्या उपोषणाला परवानगी नाकारली आहे. तरीही जरांगे आपल्या आमरण उपोषणावर ठाम आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांनी आज माध्यमांसोबत संवाद साधला.

यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. सगेसोयरे अध्यादेशाची तत्काळ अंमलबजावणी करा अन्यथा विधानसभेत नाव घेऊन पाडू, असा थेट इशारा जरांगे यांनी दिला आहे. मी लोकसभा निवडणुकीचा विषय सोडून दिला असून आता सर्वत्र शांतता आहे. निवडणुकीत हार जीत होत असते, असं मनोज जरांगे म्हणाले.

अंतरवाली सराटी येथील काही ग्रामस्थांनी माझ्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक निवेदन दिलं आहे. त्यामुळे पोलिसांनी माझ्या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. हे सरकारने केलेलं षडयंत्र आहे, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला. गेल्या १० महिन्यांपासून या ग्रामस्थांनी निवेदन का दिलं नाही? असा प्रश्न जरांगे यांनी विचारला.

सरकारला गोरगरीब मराठ्यांचं आंदोलन दडपायचे आहे. मी निवेदन देणाऱ्या गावकऱ्यांना दोष देणार नाही. पण निवेदनाच्या आधारावरच माझ्या आमरण उपोषणाला परवानगी नाकारणार असाल, तर उद्या मी मोदींनी शपथ घेऊ नये असे निवदेन देऊ का? असा तिखट सवालही जरांगे यांनी उपस्थित केला.

राज्य सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये. तत्काळ सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी. अन्यथा विधानसभा निवडणुकीत आमदारांना नाव घेऊन पाडणार, असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला. दरम्यान, जरांगे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अंतरवाली सराटी गावात बंदोबस्त वाढवला आहे. मराठा बांधवांनी उपोषणस्थळी येऊ नये, असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे.

See also  कलम 370 हटवल्याचा फायदा सातारच्या पठ्ठयाला..