औंध-रावेत मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार…

0

औंध :

औंध-रावेत मार्गावरील प्रवाशांची बारमाही वाहतूककोंडी कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने रक्षक चौकामध्ये नवीन भुयारी मार्गाची बांधणी करण्यात येणार आहे. सदर भुयारी मार्गाच्या प्रकल्पाची नुकतीच घोषणा करण्यात आली असून रक्षक चौकातील प्रस्तावित भुयारी मार्गामुळे प्रवाशांना रहदारीसाठी सुलभता निर्माण होणार असून, यामुळे प्रवाशांचा वेळही वाचणार आहे.

पिंपरी-चिंचवड आणि पुणे यांना जोडणारा औंध-रावेत पर्यंतचा 14 किलोमीटरचा रस्ता दोन्ही शहरांना जोडणारा मुख्य दुवा असल्याने यामुळे दोन्ही भागातील वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. या महत्त्वपूर्ण ट्रान्झिट कॉरिडॉरच्या मध्यभागी रक्षक चौकामध्ये प्रमुख सिग्नलयुक्त जंक्शन असल्याने प्रवाशांना सुमारे 90 सेकंद थांबावे लागते आहे. यामुळे मार्गावरील वाहतूककोंडीच्या समस्या निर्माण होऊन नागरिकांना प्रवासासाठी वेळ लागतो आहे.

महापालिकेचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे म्हणाले, हा प्रकल्प नागरिकांना पायाभूत सुविधा व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमधील सुलभतेस प्राधान्य देणारा आहे. भुयारी बांधकामासाठी आम्ही पादचारी क्रॉसिंगचा विकास आणि बीआरटीएस थांब्यांपर्यंत जाण्यासाठी सुरक्षित प्रवेश या सारख्या सर्वसमावेशक घटकांचा विचार केला गेला आहे. यामुळे सामान्य नागरिकांना सर्व पातळीवर समान गतिशीलता मिळणार आहे. याबरोबर स्थानिकांकडून संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी व भुयारी मार्गाचे डिझाईन तसेच अंमलबजावणी प्रक्रियेसाठी प्रतिक्रियाही मागविण्यात येणार आहेत.

“औंध-रावेत मार्गावरील ज्युपिटरजवळील मुळा पुलाचा वापर करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याने, रक्षक चौकामध्ये वाहतूककोंडीचा भार वाढत आहे. वाढणाऱ्या कोंडीवर धोरणात्मक उपाय म्हणून भुयारी मार्ग विकसित करण्यात येणार आहे. भुयारी मार्गामुळे औंध- रावेत मार्गावरील वाहतूककोंडी कमी करून मार्गावरून प्रवास करणाऱ्या रहिवाशांसाठी सुव्यवस्था निर्माण होणार आहे”

शेखर सिंह,आयुक्त तथा प्रशासक,पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

*औंध-रावेत अर्बन स्ट्रीट स्कॅपिंग प्रकल्पास कोणताही अडथळा नाही*

रक्षक चौक येथील प्रस्तावित भुयारी मार्ग प्रकल्प नुकताच अमलात आणलेल्या औंध-रावेत अर्बन स्ट्रीट स्कॅपिंग प्रकल्पामध्ये अडथळा येणार नाही. स्ट्रीट स्कॅपिंग प्रकल्पांतर्गत बांधण्यात आलेल्या पदपथाचे भुयारी मार्गासाठी होणाऱ्या बांधकाम, उत्खननाच्या कामावेळी कोणतेही नुकसान होणार नाही.

भुयारी मार्गाचे सकारात्मक परिणाम

1. वाहतूक प्रवाहात सुलभता : भुयारी मार्गामुळे वाहनांची गर्दी कमी होऊन वाहनांना ये-जा करण्यातील अडचणी दूर होतील.

See also  रयत स्वाभिमानी संघटने कडून अनोख्या पद्धतीने व्हॅलेंटाईन डे साजरे

2. वेळेची बचत : सार्वजनिक वाहतूक सुविधांचा लाभ घेणाऱ्यांसाठी प्रवासाचा कालावधी कमी होईल.

3. आर्थिक कार्यक्षमतेत वाढ : कमीत कमी इंधनाचा वापर होऊन आर्थिक उत्पादकता वाढेल.

4. सुरक्षित पादचारी क्रॉसिंग : सुरक्षित क्रॉसिंग सुलभ करण्यासाठी योग्य चिन्हांचा व सुरक्षित पर्यायांचा वापर होईल.

5. सार्वजनिक परिवहन यंत्रणेचे एकत्रीकरण : बीआरटीएस थांबे आणि इतर सार्वजनिक वाहतूक सुविधांमध्ये सुलभ प्रवेश, मल्टी-मॉडल मोबिलिटीला प्रोत्साहन देऊन खाजगी वाहनांवरील अवलंबत्व कमी होण्यास मदत मिळेल.6. प्रवेशयोग्यता : पादचारी, सायकलस्वार आणि दिव्यांग व्यक्तींसह सर्व प्रवाशांना लागणाऱ्या गरजा पूर्ण होतील.

7. सामुदायिक सहभाग : स्थानिक रहिवाशांचे सल्ले, प्रतिक्रियांचा वापर करून चिंता दूर करण्यासाठी त्यांच्या मतांचा विचार घेऊन प्रकल्पाच्या डिझाईन आणि अंमलबजावणी प्रक्रियेमध्ये त्यांचा सहभाग वाढविणे.