महिलेचा माईक खेचून बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका वकिलाला सरन्यायाधीशांनी थेट कोर्टाबाहेर काढले..

0

नवी दिल्ली :

सरन्यायधीशपदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून सीजेआय डीवाय चंद्रचूड हे चांगलेच चर्चेत आहे. सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना वकिलांनी तसेच उपस्थित असणाऱ्यांनी शिस्त पाळावी यासाठी चंद्रचूड नेहमीच आग्रही असल्याचं दिसून येतं.

कोर्टात नियमबाह्य पद्धतीने वागणाऱ्यांवर त्यांनी यापूर्वी अनेकदा कठोर शब्दांत ताशेरे ओढले आहे. असाच काही धक्कादायक प्रकार आज सुप्रीम कोर्टात पाहायला मिळाला. महिलेचा माईक खेचून बोलण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका वकिलाला सरन्यायाधीशांनी थेट कोर्टाबाहेर काढून दिलं. त्यामुळं आता त्यांच्या कृतीची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

सुप्रीम कोर्टात नेमकं काय झालं?

सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर एका प्रकरणावर सुनावणी सुरू होती. त्यावेळी वकील युक्तिवाद करत असताना त्यांनी अचानक सहयोगी महिला वकिलांचा माईक खेचत त्यात बोलण्यास सुरुवात केली. त्यामुळं सरन्यायाधीश वकिलाच्या वागणुकीवर चांगलेच नाराज झाले. त्यानंतर सरन्यायाधीशांनी वकिलाला थेट कोर्टाबाहेर काढून देत सुनावणीसाठी उद्या या, असं कडक शब्दांत बजावलं. तुम्ही हे काय करत आहात, तुमच्यासमोर एक महिला आणि त्यांचा माईक तुम्ही खेचताय?, तुम्ही घरातील महिलांसोबत असंच वागता का?, आता कोर्टाबाहेर जा आणि सुनावणीसाठी उद्या परत या, असं म्हणत सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी वकिलांना चांगलंच झापून काढलं आहे.

संबंधित वकील कोर्टाबाहेर निघून गेल्यानंतर पुढील खटल्यांवर सुनावणी सुरू झाली. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी वकिलांना फटकारल्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी त्यांनी अनेकदा वकिलांना फटकारून कोर्टाबाहेर काढून दिल्याच्या घटना समोर आलेल्या आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड हे कडक स्वभाव आणि धडाकेबाज निकाल देण्यासाठी प्रसिद्ध मानले जातात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर ऐतिहासिक फैसला दिला होता.

See also  फ्रान्स भारताचा राफेल देखभाल केंद्राचा प्रस्ताव स्वीकारण्यास उत्सुक