महिला विश्वचषकात उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाकडून ५ धावांनी पराभूत

0

दक्षिण आफ्रिका :

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघाला पुन्हा एकदा स्वप्नभंगाचा सामना करावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेत केप टाऊनच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय महिलांवर ५ धावांनी मात केली.

कर्णधार हरमनप्रीत कौर आणि जेमिमा रॉड्रीग्ज यांनी एकाकी झुंज दिली. परंतु सरतेशेवटी ती भारतीय संघाला विजय मिळवून देऊच शकली नाही. यासह भारतीय संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. भारतीय संघासाठी कर्णधार हरमनप्रीत कौर हिने आक्रमक अर्धशतक झळकावले.

भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान होते. मागील विश्वचषकात याच दोन्ही संघांमध्ये अंतिम सामना खेळला गेला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. एलिसा हिली व बेथ मूनी या जोडीने संघाला अर्धशतकी सलामी दिली. हिली बाद झाल्यानंतर मूनीने कर्णधार लॅनिंगसह संघाचा डाव पुढे नेत वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. तिने 54 धावा केल्या. त्यानंतर लॅनिंगने ऍश्ले गार्डनरसह आणखी एक अर्धशतकी भागीदारी करताना संघाला 150 पार नेले. लॅनिंगने अखेरपर्यंत नाबाद राहत 49 धावांची खेळी केली. यासह ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 173 धावांचे लक्ष ठेवले.

या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. शफाली वर्मा, स्मृती मंधाना व यास्तिका भाटिया 30 धावांच्या आत तंबूत परतल्या. मात्र, त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर व जेमिमा रॉड्रिग्जने भारताचा डाव सावरला. दोघींनी 69 धावांची भागीदारी केली. जेमिमाने 24 चेंडूवर 43 धावा केल्या. ती बाद झाल्यानंतर हरमनने आक्रमक फटके खेळत आपले अर्धशतक पूर्ण करत भारताला विजयाच्या दिशेने नेले. मात्र, ती दुर्दैवीरित्या धावबाद झाली. त्यानंतर रिचा घोष फारशी चमक दाखवू शकली नाही. दीप्ती शर्मा धावांची गती राखून न शकल्याने भारतीय संघाला पाच धावांनी पराभूत व्हावे लागले.

See also  ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच टी२० विश्वचषकावर आपले कोरले नाव