दक्षिण आफ्रिका :
भारतीय अंडर-१९ महिला संघासाठी आजचा (२९ जानेवारी) दिवस खूप खास असणार आहे. या दिवशी शेफाली वर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाकडे इतिहास रचण्याची आणि देशासाठी पहिला विश्वचषक जिंकण्याची सुवर्ण संधी आहे.
वास्तविक, आयसीसी अंडर-१९ टी-20 विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत खेळला जात आहे. या विश्वचषकाचा हा पहिलाच हंगाम असून अंतिम फेरीत पोहोचणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. हा विजेतेपदाचा सामना रविवारी (२९ जानेवारी) भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५:१५ वाजता पॉचेफस्ट्रूम येथील सेनवेस पार्क येथे खेळवला जाणार आहे. याच मैदानावर भारतीय संघाने न्यूझीलंड विरुद्ध उपांत्य सामना खेळला होता, ज्यात भारताने ८ विकेट्सने विजय मिळवला.
पण भारतीय संघाला फायनलमध्ये इंग्लंडला टक्कर देणे सोपे नसेल. इंग्लंडचा संघ या स्पर्धेत एकही सामना हरलेला नाही. त्यांनी ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, आयर्लंड, रवांडा पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचा पराभव केला आहे.
भारतीय संघाने या स्पर्धेत आतापर्यंत उपांत्य फेरीसह ६ सामने खेळले असून, त्यात ५ जिंकले आहेत. भारतीय संघाला एका सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. टीम इंडियाने आतापर्यंत न्यूझीलंड (उपांत्य फेरी), श्रीलंका, स्कॉटलंड, यूएई आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले आहे.