टी – 20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा…

0

नवी दिल्ली :

ऑस्ट्रेलियामध्ये 16 ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यात संघाचा समतोल राखण्यासाठी अनुभवी व युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

15 सदस्यीय टीम इंडियाचे नेतृत्त्व मुंबईकर रोहित शर्मा करणार असून उपकर्णधार म्हणून केएल राहुलची निवड करण्यात आली आहे. आशिया कपमध्ये झालेल्या दारुण पराभवामुळे संघात काही बदल करण्यात आले आहेत. विश्वचषकासाठी टीम पाठविण्याची अंतिम तारिख १५ सप्टेंबर असून भारताने डेडलाईनच्या तीन दिवस आधीच टीमची घोषणा केली आहे. यापुर्वी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, नेदरलॅंड्स व दक्षिण आफ्रिका संघांनी खेळाडूंची घोषणा केली आहे.

फलंदाजीची फळी- या स्पर्धेसाठी भारतीय संघात फलंदाजीत रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, सुर्यकुमार यादव यांना संधी देण्यात आली आहे.

गोलंदाजीची फळी- गोलंदाजीत जसप्रीत बुमराह याने कमबॅक केले असून त्याबरोबर भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग व हर्षल पटेल यांच्यावर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असेल. फिरकी गोलंदाजांमध्ये युझवेंद्र चहल, अक्षर पटेल व आर अश्विन यांचा समावेश करण्यात आला आहे.

अष्टपैलू खेळाडू- अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक पंड्या व दिपक हु़डाचा समावेश करण्यात आला आहे.

यष्टीरक्षक- यष्टीरक्षकांमध्ये दिनेश कार्तिक व रिषभ पंत यांना संधी देण्यात आली आहे.

टी२० विश्वचषकासाठी अशी आहे १५ सदस्यीय टीम इंडिया- रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सुर्यकुमार यादव, दिपक हुडा, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग आणि आर अश्विन.

स्टॅंड बाय- मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिष्णोई आणि दिपक चहर.

असा आहे टी२० विश्वचषक- या स्पर्धेत एकूण 45 टी20 सामने खेळवले जाणार असून 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर 2022 या काळात ही स्पर्धा होणार आहे. ऑस्ट्रेलियातील 7 मैदानांवर ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत दोन ग्रुप करण्यात आले असून 12 संघ यात विभागले गेले आहेत. 13 नोव्हेंबर 2022 रोजी स्पर्धेचा अंतिम सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी दीड वाजता होणार आहे.

See also  प्रथम मानांकित नोवाक जोकोविच व लाल मातीच्या बादशहा राफेल नदाल यांच्यात रंगणार उपांत्य फेरीचा सामना