भारताने हॉकी प्रो- लीगच्या युरोप दौऱ्यात ऑलिंपिक चॅंपियन्स बेल्जियमला शूट-आऊटमध्ये ५-४ असे हरवले.

0

ॲटवर्प (बेल्जियम) –

एफआयएच हॉकी प्रो- लीगच्या युरोप दौऱ्यात संध्याकाळी भारतीय महिलांना बेल्जियमविरुद्ध हार पत्करावी लागली. मात्र, पुरुष संघाने रात्रीच्या सत्रात ऑलिंपिक चॅंपियन्स बेल्जियमला शूट-आऊटमध्ये ५-४ असे हरवले.

सुरवातीला चांगला खेळ करून अगदी अखेरच्या क्षणी कच खाण्याची भारतीयांची आजपर्यंतची खोड होती. या वेळी मात्र चित्र नेमके उलटे दिसले. अखेरच्या मिनिटाला कमालीचा आक्रमक आणि वेगवान खेळ करून त्यांनी १-३ अशी पिछाडी भरून काढत सामना ३-३ असा बरोबरीत सोडवला. त्यानंतर गोलरक्षक श्रीजेशच्या कामगिरीच्या जोरावर त्यांनी ऑलिंपिक चॅंपियन्सना हरवण्याची किमया साधली.

सामन्याचा पहिला गोल भारतानेच केला होता. सामन्याच्या १७व्या मिनिटाला समशेऱ सिंगने मैदानी गोल करीन भारताचे खाते उघडले होते. त्यानंतर मात्र, बेल्जियमने भारताला दडपणाखाली ठेवत अखेरच्या काही मिनिटांपर्यंत १-३ अशी आघाडी घेतली होती. बेल्जियमसाठी चार्लर सेड्रिक, कॉगदनार्ड सायमन, दे केर्पाल निकोलस यांनी गोल केले.

भारतीय पुरुष संघाची युरोपियन दौऱ्याची सुरवात निश्चितच चांगली झाली. सामन्यतला पहिला गोल करूनही अखेरच्या मिनिटांपर्यंत मोठ्या पिछाडीवर राहणाऱ्या भारतीयांनी त्या वेळात दाखवलेली आक्रमकता आणि सामन्याचा वेग कमाल होता. जबरदस्त पद्धतीने त्यांनी सामन्यात पुनरागमन केले. अखेरच्या मिनिटाला सलग तीन पेनल्टी कॉर्नर मिळवून त्यांनी बरोबरी साधली.

त्यानंतरही शूट आऊटमध्ये सामना ४-४ असा बरोबरीतच होता. त्या वेळी गोलरक्षक श्रीजेशने बेल्जियमच्या हेंड्रिक्सचा पाचवा आणि अखेरचा प्रयत्न हाणून पाडला. मग आकाशदीपने दडपणाखाली कमालीच्या संयमाने पाचवा गोल करून भारताला विजयी केले. श्रीजेश सामन्याचा मानकरी ठरला.

See also  चौथ्या खेलो इंडिया स्पर्धेत पहिल्या दिवशी महाराष्ट्राच्या मुलां - मुलींच्या संघांची विजयी सलामी.