फ्रान्स भारताचा राफेल देखभाल केंद्राचा प्रस्ताव स्वीकारण्यास उत्सुक

0

दिल्ली :

भारत आणि फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांच्या पातळीवर चर्चा झाली. यावेळी राफेल संदर्भात काही महत्त्वाच्या मुद्यांची दोन्ही देशांनी चर्चा केली.

राफेल या लढाऊ विमानांच्या जगातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय देखभाल केंद्राची निर्मिती उत्तर प्रदेशमधील नोएडा येथे व्हावी अशी यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे.

जेवर नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळ उत्तर प्रदेशमध्ये विकसित होत आहे. या विमानतळाच्या एका भागात राफेल विमानांचे जगातील सर्वात मोठे देखभाल केंद्र विकसित व्हावे यासाठी भारत सरकारने फ्रान्ससमोर एक प्रस्ताव ठेवला आहे. आर्थिकदृष्ट्या दोन्ही देशांना लाभदायी असलेला हा प्रस्ताव स्वीकारण्यास फ्रान्स उत्सुक आहे.

चर्चेचे सर्व टप्पे पार पाडून औपचारिकरित्या राफेल देखभाल केंद्र सुरू झाले तर ‘आत्मनिर्भर भारत’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोहिमेला मोठे यश मिळणार आहे. तसेच देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल पुढे पडणार आहे. भारताच्या संरक्षण क्षेत्रासाठी तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या संरक्षण उद्योगाची प्रतिमा निर्माण करण्यासाठी राफेल देखभाल केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल.

भारताने फ्रान्सकडून ३६ तयार राफेल विमानांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यापैकी ३५ विमानं दाखल झाली आहेत. इंडोनेशियाने ४२ आणि यूएईने ८० राफेल खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. आशिया खंडातील राफेलची मागणी वाढू लागल्यामुळे फ्रान्स भारताचा राफेल देखभाल केंद्राचा प्रस्ताव स्वीकारण्यास उत्सुक आहे. संरक्षणमंत्र्यांच्या पातळीवरील चर्चेत फ्रान्सने तसे स्पष्ट संकेत भारताला दिले आहेत. लवकरच देखभाल केंद्रप्रश्नी पुढील टप्प्याची चर्चा होणार असल्याचे वृत्त आहे.

See also  नव्या कोरोनाची दहशत असतानाच भारतात ब्रिटनहून आणखी प्रवासी दाखल.