एमबीबीएसच्या परीक्षेत शरीरात ब्लूटूथ उपकरण बसवून विद्यार्थ्याने केली कॉपी

0

नवी दिल्ली :

वारंवार एमबीबीएसच्या परीक्षेत नापास होत असलेल्या एका विद्यार्थ्याने पास होण्यासाठी धक्कादायक प्रकार केला.

या विद्यार्थ्याने ऑपरेशन करून शरीराच्या आत एक ब्लूटूथ उपकरण बसवून घेतले. परीक्षेच्यावेळी विद्यार्थ्याने मोबाइल सायलेंट मोडवर ठेवला, व्हायब्रेटर पण ऑफ केला आणि ब्लू टूथ ॲक्टिव्हेट केले. यानंतर परीक्षा केंद्राबाहेर एका सुरक्षित ठिकाणी बसलेल्या व्यक्तीच्या मदतीने विद्यार्थ्याने प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यास सुरुवात केली. परीक्षा केंद्राबाहेर असलेली व्यक्ती मोबाइलवरून उत्तरं सांगत होती. शरीरात बसविलेल्या ब्लूटूथ उपकरणामुळे विद्यार्थी उत्तर आरामात ऐकून लिहित होता. भरारी पथकातील एका चाणाक्ष सदस्यामुळे हा प्रकार उघड झाला.

महात्मा गांधी मेमोरियल मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी ज्या केंद्रात पेपर लिहित होते तिथे देवी अहिल्या विद्यापीठाचे भरारी पथक कार्यरत होते. पेपर सुरू झाल्यावर भरारी पथकाच्या सदस्यांनी वेगवेगळ्या वर्गांमध्ये जाऊन कोणी कॉपी करत नसल्याची खात्री करुन घेण्यास सुरुवात केली.

भरारी पथकातील डॉ. विवेक साठे यांनी एका वर्गात परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची अंगझडती घेतली. यावेळी शरीरात ब्लूटूथ उपकरण बसवून घेणाऱ्या विद्यार्थ्याकडे मोबाइल सापडला. मोबाइल सापडला तरी उत्तरं कोणालाही कळणार नाही अशा प्रकारे कशी ऐकली हे डॉ. विवेक साठे तसेच संबंधित वर्गातील पर्यवेक्षकांच्या लक्षात आले नाही. अखेर संबंधित विद्यार्थ्याला वर्गाबाहेर काढून चौकशीसाठी नेण्यात आले.

चौकशी सुरू असताना विद्यार्थ्याने ऑपरेशन करून शरीरात ब्लूटूथ उपकरण बसवून घेतल्याची कबुली दिली. एका कान नाक घसा तज्ज्ञाने ऑपरेशन करून कानाजवळ शरीरात ब्लूटूथ उपकरण बसवून दिले. या उपकरणामुळे मोबाइलचे ब्लूटूथ ॲक्टिव्ह ठेवून कोणाच्याही नकळत संवाद साधणे शक्य होत होते; अशी माहिती विद्यार्थ्याने दिली.

एमबीबीएसच्या परीक्षेत पास होण्यासाठी ११ वर्षांपासून प्रयत्न करत होतो पण यश मिळत नव्हते. अखेर शेवटची संधी म्हणून परीक्षेला बसण्याआधी ब्लूटूथसाठीचे ऑपरेशन करून घेतल्याचे विद्यार्थ्याने सांगितले

See also  आज सादर करणार अर्थमंत्री निर्मला सीतारमण आर्थिक वर्ष 2022-23 साठी अर्थसंकल्प