गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा राजीनामा

0

गुजरात :

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत यांना आपला राजीनामा दिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मात्र त्यांनी अचानक दिलेल्या गुजरातच्या राजकारणात राजकीय हालचालींना वेग आला आहे.

भाजपाने मुख्यमंत्री पदाची संधी दिल्याबद्दल आपण भाजपा नेतृत्तवाचे आभारी आहोत. मात्र योग्यवेळी नेतृत्वात बदल करणे हा भाजपाचा स्थायीभाव आहे. पाच वर्षात भाजपाने आपल्यावर विश्वास ठेवून मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली, याबद्दल आपण पक्षाचे आभारी आहोत, गुजरातला आता नवं नेतृत्व मिळेल, असे म्हणत विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर पुर्णवेळ संघटनेचे काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तथापि विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर गुजरातचे नवे मुख्यमंत्री कोण असतील, असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीच्या नावांमध्ये केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्या नावाचा समावेश आहे. जुलै महिन्यातच मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात मनसुख मांडविया यांना केंद्रीय आरोग्य मंत्री करण्यात आले आहे. तर दुसरे नाव सध्याचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांचे आहे. याशिवाय इतर दोन नावांमध्ये सी.आर पाटील आणि पुरुषोत्तम रूपाला यांचा समावेश आहे.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांत भाजपने काही राज्यांचे मुख्यमंत्री बदलले आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री यापूर्वी दोनदा बदलले गेले, तर अलीकडेच येडियुरप्पा यांना कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. उत्तराखंडमध्ये तिरथ सिंह रावत यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवल्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पुष्कर सिंह धामी यांना नवे मुख्यमंत्री बनवले. पुढील वर्षी उत्तराखंडमध्येही विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याचबरोबर कर्नाटकात पक्षाने येडियुरप्पा यांच्या जागी बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे.

See also  बेळगावात भारत आणि जपान यांचा संयुक्त लष्करी सराव