शाखाअध्यक्ष झाला म्हणजे तिकीट मिळालं असं नाही, जो चांगला काम करेल त्यालाच तिकिट : राज ठाकरे

0

पुणे:

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांनी पुण्यातील महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी पक्षबांधणीला सुरुवात केलीय.

राज ठाकरेंनी आज पुण्यातील मनसे शाखाध्यक्षांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात राज ठाकरेंनी शाखाध्यक्षांना त्यांच्या शैलीत मार्गदर्शन केलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शाखाध्यक्षांची शाळा घेतली. शाखाध्यक्ष झालात म्हणजे तिकीट मिळालं असं नाही, जो चांगलं काम करेल त्यालाच तिकीट मिळणार असं राज ठाकरे म्हणाले.

शाखाध्यक्षांची शाळा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शाखाध्यक्षांची शाळा घेतली असल्याची माहिती आहे. शाखाध्यक्ष झालात म्हणजे तिकीट मिळालं असं नाही, जो चांगलं काम करेल त्यालाच तिकीट मिळणार, असं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. राज ठाकरे यांनी शाखाध्यक्षांचा प्रत्येक महिन्याचा कामाचा अहवाल मागवला आहे. चांगली प्रतिमा ठेवा आणि लोकांमध्ये जावा, अशा सूचना राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी शाखाध्यक्षांचा मेळावा घेतला.

निवडणुका घ्यायला हरकत नाही

निवडणुका स्थगित ठेवल्या पाहिजे. पण काम पटकन होणार असेल तर स्थगिती मान्य आहे. सरकारच्या फायद्याचं असेल म्हणून आता निवडणुका घेतल्या जात नसतील. यात काही काळंबेरं असेल तर तेही समजून घ्यायला पाहिजे. सरकारलाच या निवडणुका नको आहेत आता. कारण नंतर सरकारच महापालिका चालवणार. कारण त्यावर प्रशासक नेमणार आणि सरकारच सर्व काम बघणार. हे सर्व उद्योगधंदे सरकारचे चालू आहेत. नुसता ओबीसींचा विषय पुढे करून सरकार काही साध्य करतेय असं नको. पण जनगणना वगैरे झाल्यावर निवडणुका घ्यायला काही हरकत नाही, असं राज म्हणाले. सरकारकडे यंत्रणा आहे. त्यामुळे मनात आणलं इम्पिरिकल डेटा किंवा जनगणना हे सर्व होऊ शकतं. ती काही कठीण गोष्ट आहे असं वाटत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

गणेशोत्सवालाच गर्दी नको, ही कोणती पद्धत?

यावेळी त्यांनी गणेशोत्सव साजरा करण्यावरही मनसेची भूमिका स्पष्ट केली. सरकारचे त्या त्या पक्षाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. तिकडे गर्दी चालते. फक्त दहीहंडी आणि गणेशोत्सवाला गर्दी चालत नाही. नियम असेल तर तो सर्वांना सारखा हवा. तुमच्या पक्षांच्या कार्यक्रमाला गर्दी चालणार. फक्त गणेशोत्सवाला नको. ही कोणती पद्धत?, असा सवाल करतानाच गणेशोत्सव कसा साजरा करायचा हे मंडळं ठरवतील. गणेशोत्सव मंडळांशी बोलून चर्चा करू, असं ते म्हणाले.

See also  उरवडे येथे लागलेल्या भीषण आगीमध्ये 18 कामगारांचे मृत्यू... पंतप्रधान सहाय्यता निधीतून मदत जाहीर

हे कुठपर्यंत चालणार?

या लॉकडाऊनमुळे जे चाललं ते बरं चाललं असं सर्व सरकारला वाटतंय. आंदोलने नाही, मोर्चे नाही, सरकारच्या विरोधात कोणी बोलायचे नाही, रस्त्यावर कुणी उतरायचे नाही. काही झंझटच नाही. आपले आपले पैसे कमवा, आपली आपली दुकाने चालवा. बरं चाललंय सरकारांचं. केवळ कोरोनाची भीती दाखवली जात आहे. तिसरी चौथ्या लाटेची भीती दाखवली जात आहे. भीती दाखवून सरकार सर्व करत असेल तर हे कुठपर्यंत चालणार?, असा सवालही त्यांनी केला.