गुजरातमध्ये कोरोनाने भयंकर रूप : अंत्यसंस्कारांसाठी मोठ्या मोठ्या रांगा

0

गांधीनगर :

महिन्याभरापूर्वी गुजरात उच्च न्यायालयाने राज्यातील कोरोनना व्हायरस परिस्थितीवरून जनहित याचिका दाखल करून घेतली होती. स्थानिक प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार कोरोनामुळे परिस्थिती गंभीर असल्याचं निदर्शनास आल्याने आणि राज्य “आरोग्याच्या आपत्कालीन परिस्थितीकडे” जात असल्याचं मीडिया रिपोर्ट मध्ये नमूद केल्याने न्यायालयाने देखील दखल घेतली होती. या याचिकेवर (१२ एप्रिल) सुनावणी पार पडली होती.

यावेळी कोर्टाने विविध मुद्दे उपस्थित करत सरकारकडे उत्तरं मागितली होती. विशेष म्हणजे गुजरातच्या इस्पितळांबाहेर रुग्णांच्या रांगा लागल्या असून त्यांना जागाच उपलब्ध होतं नाही. यावरून न्यायालयाने ‘गुजरातच्या जनतेला वाटतंय की ते देवाच्या कृपेवर जगत आहेत’ अशी धक्कादायक टिपणी केल्याने गुजरात सरकारची चांगलीच पोलखोल झाल्याचं म्हटलं गेलं होतं.

आता सुद्धा गुजरातमधून धक्कादायक माहिती समोर येणं सुरूच आहे. गुजरातमध्ये कोरोनाने भयंकर रूप घेतलं असून राज्यातील अहमदाबाद, सुरत, राजकोट, भावनगर, जामनगर या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. या प्रमुख शहरांच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारांसाठी मोठ्या मोठ्या रांगा लागल्या असून तेथे वेटिंग लिस्ट देखील मोठी आहे.

दुसरीकडे, मृतांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असताना संबंधित सरकारी खात्याने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीने अनेक प्रश्न निर्माण केलं आहेत. एका रिपोर्टनुसार, गुजरातमध्ये मागील 71 दिवसात तब्बल 1.23 लाख मृत्यू दाखले वितरित करण्यात आले आहेत. परंतु, कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 4218 इतकीच दाखवण्यात आली आहे. त्यामुळे लाखो मृत्यू होऊनही केवळ 4 हजार रुग्णांचा मृत्यू कोरोनाने झाल्याचं सांगणं वास्तवाला विसंगत असल्याचं म्हटलं जातंय.

गुजरातमध्ये गेल्या वर्षी झालेले मृत्यू आणि जारी करण्यात आलेले डेथ सर्टिफिकेटचे आकडे यांच्याशी तुलना करता, जे ताजे आकडे समोर आले आहेत ते दुप्पट आहेत. गुजरातमधील वृत्तपत्र दिव्य भास्करने 1 मार्च 2021 पासून 10 मे 2021 पर्यंतच्या मृत्यू दाखल्यांवरुन एक वृत्त छापलं आहे. त्यानुसार, गुजरातमधील 33 जिल्हे आणि 8 महानगरांमध्ये 71 दिवसात आतापर्यंत 1 लाख 23 हजार 871 मृत्यू दाखले जारी करण्यात आले आहेत. यावर्षी मार्च महिन्यात राज्यात एकूण 26 हजार 026 इतके मृत्यू दाखले जारी करण्यात आले. एप्रिलमध्ये त्यामध्ये वाढ होऊन ही संख्या 57,796 वर पोहोचली. तर मे महिन्याच्या 10 दिवसातील आकडा 40,051 इतका आहे.

See also  केंद्र सरकारची पाम तेल मिशनच्या योजनेला बुधवारी मंजुरी