भारतविरुद्ध इंग्लड अटीतटीच्या सामन्यात भारताने ७ धावांनी विजय मिळवत मालिका २-१ अशा फरकाने जिंकली.

0

पुणे :

भारतविरुद्ध इंग्लड अटीतटीच्या सामन्यात भारताने ७ धावांनी विजय मिळवत मालिका २-१ अशा फरकाने जिंकली आहे. या सामन्यात भारताने इंग्लंडला ३३० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला ५० षटकात ९ बाद ३२२ धावाच करता आल्या.

रविवारी भारत विरुद्ध इंग्लंड संघातील वनडे मालिकेतील तिसरा सामना झाला. इंग्लंडकडून सॅम करनने नाबाद ९५ धावांची शानदार खेळी केली. तर भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. इंग्लंडकडून ३३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीला जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो आले होते. मात्र पहिल्याच षटकात ३ चौकारांसह १४ धावा काढून रॉय बाद झाला. त्याच्या पाठोपाठ जॉनी बेअरस्टो १ धावेवर बाद झाला.

यानंतर बेन स्टोक्स आणि डेव्हिड मलानने इंग्लंडचा डाव सावरायचा प्रयत्न केला. दरम्यान हार्दिक पंड्याने स्टोक्सचा १५ धावांवर असताना झेल सोडला. पण या जीवदानाचा स्टोक्सला फायदा उचलता आला नाही. तो ३५ धावांवर बाद झाला.

त्याच्यापाठोपाठ प्रभारी कर्णधार जोस बटलरही १५ धावांवर बाद झाला. मागील सामन्यातून पदार्पण केलेल्या लियाम लिव्हिंगस्टोनचा अडथळा शार्दुल ठाकूरने स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल घेत दूर केला. लिव्हिंगस्टोनने ३६ धावा केल्या. यानंतर चांगली कामगिरी करणारा डेव्हिड मलान ५० धावा करुन बाद झाल्याने इंग्लंडवरील दबाव वाढला.

 

मात्र, यानंतर इंग्लंडच्या तळातील फलंदाजांनी कमाल केली. एका बाजूने भक्कमपणे उभ्या असणाऱ्या सॅम करनला मोईन अलीने चांगली साथ दिली. पण तो २९ धावा करुन बाद झाला. त्यानंतर आदिल राशिद फलंदाजीसाठी त्यानेही करनला योग्य साथ दिली. त्याच्यात आणि करनमध्ये ५७ धावांची भागीदारी झाली. राशिद १९ धावांवर असताना विराटने त्याच्या अप्रतिम झेल घेतल्याने तो बाद झाला.

 

यानंतर मार्क वूडने देखील शेवटपर्यंत करनला साथ दिली. मात्र तो शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर धावबाद झाला. त्याने १४ धावा केल्या. अखेरच्या २ चेंडूवर १२ धावांची गरज असताना सॅम करनला ४ धावाच करता आल्या. त्यामुळे भारताने हा सामना ७ धावांनी जिंकला. याबरोबरच सॅम करन ८३ चेंडूत ९५ धावांवर नाबाद राहिला. त्याने या खेळीत ९ चौकार आणि ३ षटकार मारले.

See also  दिपक चहरच्या प्रयत्नानंतर देखील भारत अखेरच्या वनडेत ४ धावांनी पराभूत

 

भारताकडून गोलंदाजी करताना शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमारने ३ विकेट्स घेतल्या. तसेच टी नटराजनने १ विकेट घेतली.

भारताच्या ३२९ धावा

या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी आल्यानंतर भारताच्या शिखर धवन आणि रोहित शर्मा या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. त्यांनी १०३ धावांची सलामी दिली. मात्र, रोहित शर्मा ३७ धावांवर बाद झाला आणि ही भागीदारी तुटली. त्यापाठोपाठ शिखर धवनही अर्धशतक केल्यानंतर ६७ धावांवर बाद झाला. पाठोपाठ विराट कोहली आणि केएल राहुल प्रत्येकी ७ धावा करुन माघारी परतले.

मात्र, यानंतर हार्दिक पंड्या आणि रिषभ पंतने भारताचा डाव सावरला. पंत आणि हार्दिकमध्ये ५ व्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी झाली. ही भागीदारी पंत बाद झाल्याने तुटली. पंतने भारताकडून या डावात सर्वाधिक ७८ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ६२ चेंडूंचा सामना करताना ५ चौकार आणि ४ षटकार मारले. तसेच हार्दिक ४४ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकार मारुन ६४ धावांवर बाद झाला.

यानंतर भारतीय फलंदाजांनी नियमित अंतराने विकेट्स गमावल्या, पण त्यावेळी त्यांनी आक्रमक फटकेबाजीही केली. कृणाल पंड्याने २५ धावा केल्या. तर शार्दुल ठाकूरने ३ षटकारांसह ३० धावा केल्या. भुवनेश्वर कुमार ३ धावांवर आणि प्रसिद्ध कृष्णा शुन्यावर बाद झाला. त्यामुळे भारताचा डाव ४८.२ षटकात ३२९ धावांवर संपुष्टात आला.