मुंबई :
भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयाच्या आवारात ध्वजारोहण करत सर्व जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. देशप्रेमाची ज्योत सर्वांनी आपल्या हृदयात कायम ठेवली पाहीजे. देशातील प्रत्येक घटकाचा विकास हीच आपली जबाबदारी आहे. या जबाबदारीचे स्मरण करून देणारा आजचा हा दिवस असल्याचे ते म्हणाले.
गेल्या दोन वर्षात अभूतपूर्व कामगिरीने देशाच्या नकाशावर महाराष्ट्राने आपले नाव कोरले आहे. राज्याच्या प्रगतीची हीच गती आपल्याला भविष्यात कायम ठेवायची आहे. राज्याचा विकास आणि सर्वसामान्य जनतेचे कल्याण अशा दोन्ही आघाड्यांवर अभूतपूर्व कामगिरी झालेली आहे. समाजातील दुर्बल घटक, महिला, शेतकरी, गोरगरीबांसाठी, तरुणांसाठी आपण कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून सरकार प्रत्येक घटकाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे, हे आम्ही दाखवून दिले आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
राज्याच्या विकासाच्या आमच्या प्रयत्नात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आम्हाला साथ मिळाली. त्यामुळेच आजही महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन वेगाने धावत आहे. त्यामुळे आपली वाटचाल स्वातंत्र्याच्या शताब्दीच्या दिशेने होत आहे. २०४७ मध्ये जगात भारताचे स्थान कसे असावे, याचे नियोजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. जेव्हा आपण विकसित भारत म्हणतो, तेव्हा त्यात महाराष्ट्राचे महत्त्वाचे योगदान असेल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी मागच्या दोन वर्षांत आम्ही अनेक धोरणे राबविली आहेत. पूर्वीच्या सरकारच्या काळात महाराष्ट्राची घसरण झाली होती. मात्र त्यावर आज मी चर्चा करणार नाही. राज्याची अर्थव्यवस्था पुन्हा रूळावर आणण्याचे आव्हान आमच्यासमोर होते, ते आम्ही समर्थपणे पेलले आहे. गुंतवणूकदार आणि सामान्य माणसांत आत्मविश्वास निर्माण करण्याचे शिवधनुष्य आम्ही पेलून दाखवले. राज्यात दीड कोटी रोजगार निर्माण करण्याचे ध्येय आपण ठरविले आहे. राज्याने नुकतीच लॉजिस्टिक पॉलिसी ठरवली असून त्यातून ३० हजार कोटींचा महसूल मिळणार आहे.
*देशाच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा वाटा १४ टक्के*
देशाच्या अर्थव्यवस्थेत एकट्या महाराष्ट्राचा वाटा १४ टक्के असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. उद्योग, सेवा क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमाकांवर आहे. दोन वर्षात विक्रमी परकीय गुंतवणूक झाली आहे. स्वच्छतेमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमाकांवर आहे. गेल्या दोन वर्षात राज्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. सुमारे दहा लाख कोटींची पायाभूत सुविधांची कामे दिवसरात्र सुरू आहेत.