गतविजेता पृथ्वीराज पाटिलचे आव्हान संपुष्टात पुण्याच्या हर्षद कोकाटे सनसनाटी विजयासह अंतिम फेरीत

0

स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी :

पुणे जिल्हा संघाच्या ताकदवाना हर्षद कोकाटेने गतविजेत्या पृथ्वीराज पाटीलला गुणांवर मात देत ६५व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गादी विभागातून आपली आगेकूच कायम राखली. आपली घोडदौड कायम ठेवण्यासाठी हर्षदला उद्या शिवराज राक्षेचे आव्हान परतवून लावावे लागेल.

संस्कृती प्रतिष्ठान आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावतीने कोथरुड उपनगरात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र केसरी वजन गटात सफाईदार आगेकूच करणाऱ्या पुण्याच्या हर्षद कोकाटेने लढतीत आपली सारी ताकद पणाला लावली. महाराष्ट्र केसरी किताबानंतर गेल्याच महिन्यात राष्ट्रीय विजेता ठरलेला पृथ्वीराज पाटिल चांगल्या लयीमध्ये होता. संभाव्य विजेता म्हणून त्याच्याकडेच बघितले जात होते. मात्र, गुरुवारी मॅटवर अनपेक्षित निर्णय लागला. गुणांवरच निर्णायक ठरलेल्या लढतीत हर्षद कोकाटेने गतविजेत्या पृथ्वीराज पाटीलचे आव्हान ९-३ असे सहज संपुष्टात आणले.

क्रीडानगरीत उपस्थित असलेल्या प्रत्येक कुस्ती प्रेमीचे लक्ष या लढतीकडे लागले होते. हर्षदने आपली उंची आणि ताकदीचा पूर्ण उपयोग करून घेत खेळ केला. लढतीच्या सुरुवातीलाच आक्रमक खेळण्याच्या नादात पृथ्वीराजकडून लढत धोकादायक स्थितीत गेली आणि त्याचे पाठोपाठ दोनवेळा दोन गुण हर्षदला मिळाले. त्यानंतर लढत बाहेर गेल्यामुळे पृथ्वीराजला एक गुण मिळाला. पहिल्या फेरीनंतर पृथ्वीराजने सातत्याने आपली आक्रमकता कायम ठेवली. मात्र, हर्षदने आपला बचाव भक्कम ठेवत त्याला निराश केले. हर्षदने पुढे ही आघाडी आणखी भक्कम करत सनसनाटी विजयावर शिक्कामोर्तब केले.

माजी विजेता हर्षवर्धन सरगीर यानेही गादी विभागातून आपली आगेकूच कायम राखली आहे. हर्षवर्धनने तिसऱ्या फेरीत समीर शेखचे आव्हान अत्यंत सावध लढतीत ३-० असे संपुष्टात आणले. दरम्यान माती विभागातून माजी विजेता बाला रफिक शेख आणि साताऱ्याचा किरण भगत, लातूरचा शैलेश शेळके यांनी आपली आगेकूच कायम राखली. पुणे शहराच्या पृथ्वीराज मोहोळचे पदार्पण अपयशी ठरले असले, तरी त्याने तिसऱ्या फेरीत शैलेश शेळकेला दिलेली लढत तुल्यबळ ठरली. पृथ्वीराजने आपल्याबद्दलच्या अपेक्षा निश्चित उंचावल्या अशीच प्रतिक्रिया क्रीडानगरीत उमटत होती.

See also  भारताचा बॉक्सर शिवा थापाने आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सलग पाचवे पदक पक्के

आजच्या दिवसाच्या शेवटच्या लढतीमध्ये बाला रफिक शेख ने साताऱ्याचे किरण भगतला केवळ एक मिनिटाच्या आत दुहेरी पट टाकत चितपट केले