ऑस्ट्रेलियाचा टी – २० मध्ये भारतावर चार विकेटने विजय

0

मोहाली :

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला मंगळवारी (20 सप्टेंबर) सुरुवात झाली. मोहाली येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ऍरॉन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजीची संधी मिळालेल्या भारतीय संघाने खराब सुरुवातीनंतरही जबरदस्त फलंदाजी करत 208 धावा धावफलकावर लावल्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने अखेरपर्यंत हार न मानता 4 गड्यांनी विजय संपादन केला.

भारतीय संघासाठी रोहित शर्मा व केएल राहुल यांनी सलामी दिली. रोहितने दुसऱ्या षटकात पॅट कमिन्स याला एक षटकार व एक चौकार ठोकत चांगली सुरुवात केली. मात्र, तिसऱ्या षटकात तो बाद झाला. त्याने 9 चेंडूवर 11 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विराट कोहलीवर हेजलवूड व झंपा यांनी दबाव आणला. तो 7 चेंडूवर 2 धावा करत बाद झाला. भारतीय संघ पावर प्लेमध्ये 2 बाद 46 धावा करू शकला. मात्र त्यानंतर राहुल व सूर्यकुमार यादव यांनी कोणतेही दडपण न घेता ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर प्रतिहल्ला केला. धावगती अजिबात कमी होऊ न देता त्यांनी षटकार चौकार मारणे सुरू ठेवले. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी 68 धावांची भागीदारी केली. राहुल 55 धावांची खेळी करत तंबूत परतला. तर सूर्यकुमारने 25 चेंडूवर 46 धावा फटकावल्या. हार्दिक पंड्याने सुरुवातीपासून आक्रमण केले. अक्षर पटेल व दिनेश कार्तिक फारसे योगदान देऊ शकले नाहीत. मात्र, हार्दिकने अखेरपर्यंत नाबाद राहत 30 चेंडूंमध्ये 71 धावा करत संघाला 208 धावांपर्यत मजल मारून दिली.

या भल्यामोठ्या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाला कर्णधार फिंच व युवा कॅमेरून ग्रीनने वेगवान 39 धावांची सुरुवात दिली. फिंच 22 धावा करत बाद झाल्यानंतर ग्रीनने अक्षरशा मैदानात तुफान आणले. त्याने 30 चेंडूवर 61 धावा चोपल्या. त्यानंतर उमेश यादवने स्मिथ व मॅक्सवेलला एकाच षटकात बाद करत सामन्याला कलाटणी दिली. मात्र, मॅथ्यू वेड व पदार्पण करणारा टीम डेव्हिड यांनी कोणतेही दडपण न घेता खराब चेंडूवर मोठे फटके मारत संघाला विजयाच्या दिशेने नेले. हर्षल पटेलच्या 18 व्या षटकात 22 धावा आल्याने सामना ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकला. उरलेल्या 18 पैकी 16 धावा भुवनेश्वर कुमारच्या षटकात लुटत ऑस्ट्रेलियाने सामन्यावर कब्जा केला. अखेरच्या षटकात डेव्हिड बाद झाल्यानंतर कमिन्सने विजयाचे सोपस्कार पूर्ण केले.

See also  चेन्नई सुपर किंग्सने २७ धावांनी विजय मिळवत चौथ्यांचा आयपीएल चषकावर कोरले नाव.