असेल हिंमत तर मध्यावधी निवडणुका घेऊन दाखवा : उद्धव ठाकरे

0

मुंबई :

महाराष्ट्राचं राजकारण गेल्या पंधरा दिवसात ढवळून निघालंय.

एकनाथ शिंदेंनी अख्खी शिवसेना फोडली. त्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कमालीचे सक्रिय झाले आहेत. मुख्यमंत्री पद सोडावं लागल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आता भाजपला थेट आव्हान दिलं आहे. शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देत भाजपने सत्ता पुन्हा काबीज केलीय. यानंतर उद्धव ठाकरेंना भाजपवर गंभीर आरोपही केलेत. असेल हिंमत तर मध्यावधी निवडणुका घेऊन दाखवा, असं थेट आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलंय. तसंच शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा डाव आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. शिवसेना भवनात उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रभरातील जिल्हा प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये ते बोलत होते. खेळ करत बसण्यापेक्षा आपण जनतेच्या कोर्टात जाऊ असं ते म्हणालेत.

विधानसभेत मनमानी!
सध्याच्या राजकीय घडामोडींवरही उद्धव ठाकरेंनी परखड विधान केलं. विधानसभा मनमानी पद्धतीने चालवती जात असून हा घटनेचा अपमान आहे, असं त्यांनी म्हटलंय. सध्या राज्यात जे सुरु आहे, ते घटनेला धरुन आहे की डॉ. आंबेडकरांनी बनवलेली घटना मोडण्याचा प्रकार सुरु आहे, या घटनातज्ज्ञांनी सांगावं, असंही ते म्हणाले.

शिवसेना भवनात जिल्हाप्रमुखांशी संवाद
शिवसेनेचे 40 आमदार फुटल्यानंतर शिवसेना आता पुन्हा नव्यानं उभी करण्याचं आव्हानं उद्धव ठाकरेंसमोर आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून बैठकांचं सत्र सुरु आहे. खासदार, आमदार, जिल्हाप्रमुखांसह स्थानिक पातळीवरील नेतृत्त्वाचं संघटनात्मक धोरणांसाठी उद्धव ठाकरेंकडून बैठका घेतल्या जात आहेत.

सोमवारी दादर येथील शिवसेना भवनात जिल्हा प्रमुखांशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी लढायचं असेल, तर सोबत राहा असं उद्धव ठाकरेंनी जिल्हा प्रमुखांना म्हटलंय. या बैठकीला शिवसेनेचे नेते दिवाकर रावते, सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत, माजी आमदार दगडू सकपाळ आणि रवींद्र मिर्लेकरही उपस्थित होते.

 

See also  बर्ड फ्लू संदर्भात अफवा व चुकीची माहिती पसरू नये : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे