राज्यात नवीन सरकारच्या स्थापनेसाठी भाजपच्या हालचाली सुरू

0

मुंबई :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने आता नवीन सरकारच्या स्थापनेसाठी भाजपने आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत.

उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर भाजपने जोरदार घोषणा देत विजयाचा जल्लोष साजरा केला. फडणवीस हे आता तिसऱ्यांदा शपथ घेण्याच्या तयारीत आहेत. ठाकरे यांनी राजीनामा दिल्याने सभागृहातील महाविकास आघाडी सरकारने विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा प्रसंगही टाळला आहे. भाजपचे सर्व आमदार आणि नेते उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीसाठी हाॅटेल ताजमध्ये एकत्र आले होते. तेथे ठाकरे यांच्या राजीनाम्याची वार्ता येताच जल्लोष सुरू झाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे पेढा भरवून अभिनंदन केले.

मी पुन्हा येणार, हे फडणवीस यांचे विधान 2019 च्या प्रचारात गाजले होते. शिवसेना-भाजप यांची युती बहुमत घेऊन आलेली असतानाही शिवसेनेने भाजपला पाठिंबा देण्यास नकार दिला. फडणवीस यांचा फोनही ठाकरे यांनी सरकार स्थापनेच्या वेळी घेतला नाही. त्यावर चिडलेल्या फडणवीस यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी घेतला. हे सरकार तीन दिवसांपर्यंत चालले. त्यामुळे फडणवीस यांना तातडीने पायउतार व्हावे लागले.

राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने फडणवीस यांनी महाविकास आघाडीला भगदाड पाडले. नंतर तर शिवसेनेतच फूट पाडली. एकनाथ शिंदे यांच्यासह 50 आमदारांना भाजपसोबत आणण्याचे काम फडणवीस यांनी केले. ठाकरे सरकार पाडण्याची योजना फडणवीस यांनी गोपनीयतेने आखली. या कानाची त्या कानाला खबर नव्हती. शिवसेनेचे आमदार फुटल्याने ठाकरे यांची कोंडी झाली. त्यामुळे त्यांनी आता राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे फडणविसांचे आता नवीन शपथविधीसाठी सज्जा झाले आहेत.

See also  कोरोनाच्या 'डेल्टा प्लस' व्हेरियंटची जास्त काळजी करू नये : राजेश टोपे