मुंबईत हवेची गुणवत्ता अतिशय खराब !

0

मुंबई :

नवीन वर्षांचा पहिलाच दिवस ढगाळ हवा आणि प्रदूषणास तोंड द्यावे लागले. नवीन वर्षांच्या पहिल्याच दिवशी मुंबईत अनेक ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक अतिवाईट स्तरावर घसरला. दिवसभरात सर्वच ठिकाणी प्रदूषक घटकांचे प्रमाण वाढल्याने गुणवत्ता निर्देशांकात घसरण झाली. शहर आणि उपगनरात सफर (सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च) आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांची एकूण १९ ठिकाणी हवेची गुणवत्ता मोजणारी संयंत्रे आहेत. यापैकी आठ ठिकाणी वाईट, पाच ठिकाणी अतिवाईट आणि केवळ सहा ठिकाणी हवेचा गुणवत्ता निर्देशांक मध्यम पातळीवर असल्याची नोंद झाली. सर्वाधिक हवा प्रदूषण वांद्रे-कुर्ला संकुलात आढळले.

दोन्ही यंत्रणांच्या नोंदीनुसार वांद्रे-कुर्ला संकुल, मालाड, माझगाव, चेंबूर आणि कुर्ला या ठिकाणी हवेची गुणवत्ता अतिवाईट स्तरावर (प्रदूषत घटक ३०१ ते ४००) पोहचला. प्रदूषक घटक २.५ चे सर्वाधिक प्रमाण हे वांद्रे-कुर्ला संकुलात ३५८ नोंदविण्यात आले. वरळी, अंधेरी, बोरिवली, आंतराष्ट्रीय विमानतळ, कांदिवली, मुलुंड, पवई आणि शीव या ठिकाणी हवेची पातळी वाईट स्तरावर (प्रदूषक घटक २०० ते ३००) नोंदविण्यात आली. थंडीच्या काळात कोरडे वारे आणि ढगाळ हवेमुळे गुणवत्ता निर्देशांक घसरण्यात भर पडली.

See also  लॉकडाऊन शेवटचा पर्याय ! मुख्यमंत्री