पीएमपीएलच्या पास रद्द करण्याच्या निर्णयाविरुद्ध ग्रामीण भागात तीव्र संताप.

0

पुणे :

पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPML) ग्रामीण, शहरी भागासाठी असलेला दैनंदिन 70 रुपयांचा आणि मासिक 1400 रुपयांचा पास रद्द करण्याचा निर्णय १ एप्रिल रोजी घेतला. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड महागरपालिका हद्दीबाहेरील प्रवाशांना बसप्रवासासाठी तिकीट काढण्याशिवाय पर्याय नाही. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात नोकरी व्यवसायानिमित्त अनेक प्रवासी दररोज प्रवास करत असतात. तसेच आसपासच्या परिसरातून अनेक विद्यार्थीही शिक्षणानिमित्त शहरात येत असतात. पास रद्द करण्याच्या निर्णयाचा मोठा फटका या सर्व घटकांना बसणार असल्याने या निर्णयाविरुद्ध ग्रामीण भागातील प्रवासी तीव्र संताप व्यक्त करत आहेत.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत प्रवास करण्यासाठी सवलतीच्या दरात दोन प्रकारचे पास (Bus Pass) उपलब्ध आहेत. एकाच महापालिका हद्दीत प्रवास करण्यासाठी दिवसभर प्रवासाचा पास ४० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तर, दोन्ही महापालिका हद्दीत प्रवास करण्यासाठी ५० रुपयांचा पास उपलब्ध आहे. महापालिका हद्द वगळून दिवसभर प्रवास करण्यासाठी पास ७० रुपये होता. तर मासिक पास १४०० रुपयांना होता. मात्र, हा पास १ एप्रिलपासून बंद करण्याचा निर्णय पीएमपीने घेतला आहे. या निर्णयास PMRDA भागातील प्रवाशांनी मोठा विरोध केला आहे. पीएमपीने पासेस बंद करण्याचा घेतलेला निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी पुणे-सासवड मार्गावरील दैनंदिन प्रवासी विद्यार्थी दत्ताञय फडतरे यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीबाहेर पीएमपीच्या मोरगाव, जेजुरी, सासवड, भुलेश्वर, वीर, निरा, यवत, उरुळी-कांचन, दौंड, मंचर, वेल्हा, राजगुरुनगर, कापुरव्होळ, जुन्नर, मुळशी, शिरुर, लोणावळा, शिक्रापुर, पाबळ या भागात बसेस सुरु आहेत. या भागातील प्रवाशांचे सवलतीतील पासेस बंद केले आहेत. पासेसमुळे महामंडळास तुट सहन करावी लागत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, सवलतीत उपलब्ध असणारे पास बंद केल्यामुळे खाजगी वाहन प्रवास आणि पीएमपी प्रवास यात फरकच उरत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

See also  पिंपरी चिंचवड सराईत गुन्हेगाराकडुन पिस्टल जप्त : सांगवी पोलीस ठाणेची कारवाई.

दैनंदिन आणि मासिक सवलतीतील पासेस बंद केल्यामुळे नोकरी-व्यवसायासाठी महानगरात येणाऱ्या महिला, युवक आणि ज्येष्ठ प्रवाश्यांसह शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. महामंडळाने सवलतीचे पासेस बंद करुन ग्रामीण पीएमपी प्रवाशांना आर्थिक त्रास देऊ नये तसेच सवलतीतील पासेसच्या दरात काहीशा प्रमाणात वाढ करावी, मात्र, पास पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी फडतरे यांनी पीएमपी महामंडळाकडे निवेदनाद्वारे केली आहे.