एप्रिल मध्ये पुणे महानगरपालिकेची निवडणूक होण्याची शक्यता !

0

पुणे :

राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेने सादर केलेल्या बहुसदस्यीय प्रारूप प्रभाग रचनेस मान्यता दिली आहे़ त्यानुसार ही प्रभाग रचना मंगळवार, एक फेब्रुवारी रोजी हरकती व सूचना मागविण्याकरिता जाहिर करण्याचे आदेश महापालिकेला शनिवारी मध्यरात्रीनंतर प्राप्त झाले आहेत़.

आयोगाने निवडणूक प्रभागांच्या सीमांची प्रसिध्दी, हरकती व सूचना मागविणे, सुनावणी देणे आदी कार्यवाहीसाठी कार्यक्रम जाहिर केला आहे़ प्रारूप प्रभाग रचना १ फेब्रुवारीला जाहीर करणे, त्यानंतर सोमवार दि.१४ फेब्रुवारीपर्यंतच्या काळात प्रारूप अधिसूचनेवर हरकती व सूचना मागविणे, १६ फेब्रुवारीपासून आलेल्या हरकती व सूचनांचे विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत़.

या सादरीकरणानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत हरकती व सूचनांवर शनिवार दि. २६ फेब्रुवारी रोजी सुनावणी देण्यात येणार आहे़ या सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशी विहीत नमुन्यात नमूद करून विविरणपत्र राज्य निवडणुक आयोगास २ मार्च रोजी पाठविण्यात येणार असून, त्यानंतर शहरातील ५८ प्रभागांची रचना अंतिम केली जाणार आहे़.

महापालिकेने आगामी निवडणुकीकरिता ५८ प्रभाग निश्चित केले आहेत. यातील ५७ प्रभाग हे ३ सदस्यीय तर १ प्रभाग हा २ सदस्यांचा राहणार आहे़. आयोगाने २०११ च्या जनगणनेनुसार ३५ लाख ५६ हजार ८२४ लोकसंख्या गृहित धरून सरासरी ४१ हजार ११९ लोकसंख्येचा एक प्रभाग निश्चित केला आहे़. यामध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या ४५ हजार २३१ इतकी तर कमीत कमी लोकसंख्या ३७ हजार ७ इतकी आहे़ महापालिकेसाठी आगामी निवडणुकीतून १७३ नगरसेवक निवडुण येणार असून, यामध्ये सध्या २३ अनुसुचित जातीकरिता २ अनुसुचित जमाती करिता जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत़ तर अनुसुचित जातीमधील आरक्षित जागांपैकी ५० टक्के म्हणजे १२ व अनुसुचित जमातीकरिता १ महिलांसाठी जागा आरक्षित आहे़ तसेच एकूण जागांपैकी ७४ जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत.

महापालिकेची मुदत येत्या १४ मार्च रोजी मध्यरात्री संपत असून, २ मार्च रोजी प्रभाग रचना अंतिम झाल्यावर पुढे आरक्षणाचा विषय व आचारसंहितेचा कमीत कमी कालावधी गृहित धरला तरी १४ मार्चपर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार नाही. त्यामुळे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच महापालिकेत प्रशासक नियुक्त होणार आहे़. सर्व निवडणुक प्रक्रिया पूर्ण होऊन एप्रिलचा शेवटचा आठवडा किंवा मेच्या पहिल्या आठवड्यात महापालिकेची निवडणुक होईल असे चित्र आहे़.

See also  अहमदनगर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण वाढले, ६१ गावात लॉकडाऊन जाहीर