पुणे मनपामध्ये समाविष्ट २३ गावांतील सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी बांधकाम व्यावसायिकाची

0

पुणे :

पुणे मनपामध्ये समाविष्ट २३ गावांतील पीएमआरडीएने PMRDA बांधकाम परवानगी दिलेल्या सोसायट्यांना यापुढे महापालिका टँकरने पाणी पुरवठा करणार नाही.

ही बांधकामे करताना संबंधित बांधकाम व्यावसायीकांनी सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी स्वीकारत असल्याची अट मान्य केल्याने समाविष्ट गावातील शेकडो सोसायट्यांना तूर्तास तरी बांधकाम व्यावसायीक अथवा ‘स्वखर्चाने’च ‘तहान’ भागवावी लागणार आहे.

वर्षभरापुर्वी २३ गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली आहेत. पुणे महापालिका हद्दीलगतच्या या गावांमध्ये पुर्वी ग्रामपंचायत व शासकिय योजनेतून पाणी पुरवठा करण्यात येत होता. तर महापालिकेच्यावतीनेही पाच कि.मी. पर्यंतच्या गावांत पाणी देण्यात येत होते. दरम्यान पाच वर्षापुर्वी पीएमआरडीएची स्थापना झाली. पीएमआरडीएच्या स्थापनेनंतर संबधित गावांमधील बांधकामांना पीएमआरडीएकडून बांधकाम परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू झाली.

गावांच्या समावेशापुर्वीपासूनच २३ गावांमध्ये जिल्हाधिकार्‍यांच्या मान्यतेने मोठ्याप्रमाणावर बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच मागील पाच वर्षात पीएमआरडीएनेही या गावांमध्ये एक हजारांहून अधिक ‘स्किम्स’ला बांधकाम परवानगी दिली आहे. विशेष असे की, ही परवानगी देताना संबधित सोसायटी अथवा इमारतींना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी संबधित विकसकांवरच राहील, ही अट घालण्यात आली आहे.

सदनिकांच्या किंमती गगनाला भिडल्याने अनेकांनी उपनगरांत आणि किंबहुना २३ गावांत तुलनेने स्वस्तात मिळणार्‍या ‘घरा’चे स्वप्न पुर्ण केले. परंतू यामुळे गावठाणाबाहेर असलेल्या अनेक सोसायट्यांना पाणी पुरवठा करण्यास ग्रामपंचायतींपुढे अडचणी आल्याने अनेक सोसायट्यांना टँकरनेच पाणी पुरवठा केला जात आहे. (Pune Corporation)

दरम्यान, २३ गावे महापालिकेमध्ये समाविष्ट झाल्यानंतर २०२२ मध्ये महापालिकेची पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणूक (PMC Election) होत आहे. त्यामुळे इच्छुकांनी आणि प्रामुख्याने नवीन भाग जोडला गेलेल्या नगरसेवकांनी (Corporators in Pune) या गावांमधील सोसायट्यांना महापालिकेच्या खर्चातून टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे. त्याचवेळी महापालिका प्रशासनाने गावठाणांमध्ये महापालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या यंत्रणेतून पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी उचलली आहे. परंतू ज्या सोसायट्यांना बांधकाम व्यावसायीकांनी पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी घेतली आहे, अशा सोसायट्यांना तूर्तास तरी खाजगी टँकरच्या माध्यमातूनच पाणी खरेदी करावी लागेल अशी भुमिका महापालिकेने घेतली आहे. महापालिकेने त्या सोसायट्यांची आणि विकसकांची यादीच पीएमआरडीएकडून मागविली आहे.

See also  हवामान बदलांना सक्षमपणे सामोरे जात पर्यावरणाचे जतन करावे लागेल : आदित्य ठाकरे

या गावांच्या हद्दीत मागील पाच वर्षांत पीएमआरडीएने….

सूस, म्हाळुंगे, लोहगाव, वाघोली, पिसोळी, उंड्री, आंबेगाव खुर्द, धायरी, उत्तमनगर, शिवणे या गावांच्या हद्दीत मागील पाच वर्षांत पीएमआरडीएने एक हजारांहून अधिक बांधकामांना परवानगी दिली आहे. यापैकी सूस, म्हाळुंगे. लोहगाव, वाघोली या परिसरात सर्वाधीक स्किम्स झाल्या आहेत. पुणे शहराच्या पाणी पुरवठा यंत्रणेतही ही गावे अगदी शेवटाकडे असल्याने पुर्वीपासूनच कमी दाबाने आणि कमी वेळ पाणी पुरवठा होत आहे.