एसीबी ने केलेल्या कारवाई प्रकरणातील दोषींवर कारवाई केली जाईल : चंद्रकांत पाटील

0

पिंपरी चिंचवड :

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील स्थायी समिती अध्यक्षांसह 4 जणांवर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर त्यांना पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे.

एसीबीच्या या कारवाईवरुन पिंपरी-चिंचवड शहरात राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. या कारवाईनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा संघर्ष सुरू झाल्याचं चित्र शहरात दिसून येत आहे. या प्रकरणात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोषींवर कारवाई केली जाईल, असं आश्वासन दिलं आहे. तसंच स्थायी समिती सदस्यांनी तपासात सहकार्य करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

चंद्रकांत पाटील यांच्या सुचनेनुसार पिंपरी-चिंचवडच्या प्रभारी आमदार माधुरीताई मिसाळ यांनी आज पिंपरी-चिचवडला भेट दिली. तिथे घडलेल्या प्रकाराबद्दल सर्व संबंधीतांशी चर्चा करुन सविस्तर माहिती घेतली. या प्रकरणाबाबत सविस्तर अहवाल त्या मला सादर करतील आणि त्यानंतर या प्रकरणात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. तसेच स्थायी समितीच्या सर्व सदस्यांनी पोलिस तपासात संपुर्ण सहकार्य करावे अशी सुचनाही चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. या सर्व प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल व या षडयंत्रा मागील चेहरा समाजापुढे उघड होईल असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

नितीन लांडगेंसह तिघांना पोलीस कोठडी

स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांना काल शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. नितीन लांडगे यांच्यासह तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 9 लाखाच्या लाच प्रकरणात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत नितीन लांडगे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल कारवाई केली होती. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्या. या प्रकरणात सरकारी वकिलांनी पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र कुठलेही पुरावे मिळाले नसल्याने न्यायालयाने त्यांना शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.

See also  उरवडे दुर्घटनेला कंपनी मालकच जबाबदार असल्यामुळे त्याच्याविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल