पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी जमिनीची मोजणी काही गावात पुर्ण.

0

पुणे :

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी पुणे जिल्ह्याच्या हवेली तालुक्यातील १२ पैकी ७ गावांमध्ये जमिनींच्या मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता तिथे भूसंपादन केले जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांच्या विकासाला चालना मिळणार आहे. या प्रकल्पासाठी या ३ जिल्ह्यांमधील १ हजार ४७० हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे.

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे हा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यासाठी पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, जुन्नर आणि आंबेगाव या चार तालुक्‍यांतील ५७५ हेक्टर भूसंपादन केले जाणार आहे. त्यासाठी १,३०० ते १,५०० कोटींचा निधी लागणार आहे. शेतकऱ्यांसोबत थेट संपर्क साधून हे भूसंपादन केले जाणार आहे. हवेली तालुक्यातील हडपसर, मांजरी खुर्द, मांजरी बुद्रुक, कोलवडी, साष्टे, बकोरी, वाडे बोल्हाई, तुळापूर, लोणीकंद, केसनंद, पेरणे, बावडी या गावांमधून हा रेल्वे मार्ग जाणार आहे. यातील कोळवाडी, साष्टी, मांजरी खुर्दसह ७ गावांमधील मोजणीचे काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती भूसंपादन अधिकारी रोहिणी आखडे यांनी दिली.

या रेल्वेमार्गासाठी १२ गावांमध्ये १३१ हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. सध्या पावसामुळे मोजणीत अडचणी येत आहेत. त्यामुळे पुढील महिन्यात हवेली तालुक्यातील उर्वरित गावांमधील मोजणीचे काम पूर्ण केले जाणार आहे. २३५ किलोमीटर लांबीच्या या रेल्वेमार्गावरून ताशी २०० किलोमीटर वेगाने रेल्वे धावणार आहे. यात १८ बोगदे, ४१ उड्डाणपूल आणि १२८ भुयारी मार्ग नियोजित आहेत. पुणे-नाशिक हे अंतर यामुळे पावणे दोन तासांत पूर्ण करणे शक्य आहे. या रेल्वे मार्गावर २४ रेल्वे स्थानके असतील.

See also  लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी सोबतच लोकाभिमुख कारभार व्हावा : अजित पवार