रुपी सहकारी बँक या पुण्यातील नामवंत बँकेचे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये तातडीने विलीनीकरण करावे : गिरीश बापट

0

पुणे :

रुपी सहकारी बँक या पुण्यातील नामवंत बँकेचे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये तातडीने विलीनीकरण करावे अशी मागणी खासदार गिरीश बापट यांनी मंगळवारी लोकसभेत केली. नियम 377 अन्वये त्यांनी लोकसभेत विलीनीकरणाचा मुद्दा उपस्थित केला.त्यावेळी त्यांनी ही मागणी केली. विलीनीकरणासाठी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी रिझर्व्ह बॅकेला सूचना कराव्यात. असेही बापट यांनी सांगितले. बापट म्हणाले ‘ पुण्याची रुपी बँक एकशे आठ वर्ष इतकी जुनी आहे. या बँकेत चार लाख खातेदारांनी ठेवी ठेवल्या आहेत. बँकेकडे बाराशे कोटी रुपयांचे डिपॉझिटस आहेत.विशेष म्हणजे लोकमान्य टिळकांनी ही बँक स्थापन केली .त्याकाळी एक एक रुपया गोळा करून लोकांनी ही बँक उभी करण्यास मदत केली होती.

आजही या बँकेच्या खातेदारांमध्ये ज्येष्ठ नागरिक, निवृत्तीवेतनधारक आणि मध्यमवर्गीय लोकांचा अधिक समावेश आहे. मी आज पर्यंत या प्रश्नाबाबत अनेक वेळा विविध पातळीवर तसेच लोकसभेतही या बँकेच्या विलीनीकरणाचा मुद्दा मांडला होता. तथापि त्याबाबत अद्यापही अंतिम निर्णय झाला नाही. म्हणून माझी आपल्या द्वारे सरकारला विनंती आहे की सरकारने या प्रश्नात त्वरित लक्ष घालावे. बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये रुपी बँकेच्या विलीनीकरणाच्या प्रस्तावास त्वरित मंजुरी देण्याबाबत रिझर्व्ह बँकेस सुचना करावी अशी आग्रहाची मागणी मी पुणेकरांच्या वतीने करीत आहे.

See also  पुणे मेट्रोचे काम पूर्णत्वाकडे, लवकरच सुरू होणार !