उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त २५५ खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती देण्यात येणार : हेमंत रासने

0

पुणे :

महापालिकेच्या नवीन सुधारीत क्रीडा धोरणानुसार उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त २५५ खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती देण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, ‘सन २०१३ मध्ये महापालिकेने स्वतंत्र क्रीडा धोरण तयार केले होते. यामध्ये अनेक त्रुटी असल्याने दोन वर्षांपूर्वी महापालिकेने सुधारीत नवीन क्रीडा धोरणास मंजुरी दिली. या नवीन धोरणाप्रमाणे पुणे महापालिका हद्दीत राहणार्या आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणार्या आणि विशेष नैपुण्य प्राप्त उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येकी पन्नास हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते.’

रासने पुढे म्हणाले, ‘राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याच्या उद्देशाने प्रोत्साहनपर ही शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्ती देण्यासाठी १ कोटी २७ लाख ५० हजार रुपयांच्या तरतुदीला आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या खेळाडूंचा महापालिकेच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पाच लाख सात हजार रुपये खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. अशा प्रकारे एकूण सुमारे १ कोटी ३२ लाख ५७ हजार रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली.’

See also  अजित पवार यांनी स्वत: साठी राखीव असलेला सूट गृहमंत्र्यांसाठी दिला