अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एसकेपी कॅम्पस ची अजित आकांक्षा स्कॉलरशिप योजना सुरू.

0

पुणे :

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या बालेवाडी येथील श्री खंडेराय प्रतिष्ठानने (एसकेपी कॅम्पस) दिलासादायक निर्णय घेतला आहे. संस्थेने अजित आकांक्षा स्कॉलरशिप योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत इयत्ता दहावीत घवघवीत यश मिळवणाऱ्या मात्र आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या विद्यार्थीनींना स्कॉलरशिप देण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे सचिव आणि पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. सागर बालवडकर यांनी दिली.

बाणेर, बालेवाडी, सुस आणि म्हाळुंगे परिसरातील दहावी परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थीनींसाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले मात्र घरची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने पुढील शिक्षणाचे काय, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो. पुढील भवितव्याच्या दृष्टीने शिक्षण तर अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे केवळ आर्थिक परिस्थिती नाही म्हणून शिक्षण घेता आले नाही, असे त्यांच्या बाबतीत घडू नये, यासाठी संस्थेने पुढाकार घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून संस्थेमार्फत योजना सुरू करण्यात आली आहे, असे सागर बालवडकर यांनी सांगितले.

या स्कॉलरशीप योजनेबाबत आधिक माहितीसाठी एसकेपी कॅम्पस, बालेवाडी 8669977909 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेमार्फत करण्यात आले आहे.

दरम्यान, सामाजिक उपक्रमांत संस्थेचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाच्या ठरणाऱ्या विविध मुद्द्यांवर जनजागृती अभियान राबवण्यात येते. संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. रक्तदान शिबीर, वृक्षारोपण अभियान, मोफत आरोग्य तपासणी असे समाजोपयोगी उपक्रम दर महिन्यात घेण्यात येतात. यांसह अन्य सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचे भान ठेवण्यात येते. कोरोनाच्या संकटात अनेक लहान मुले सुद्धा निराधार झाली आहेत. त्यांच्या भवितव्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येची जाणीव झाल्याने केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी या मुलांना मदत करण्यासाठी काही योजना सुरू केल्या आहेत. श्री खंडेराय संस्थेनेही या कामी पुढाकार घेत कोरोनामुळे निराधार झालेल्या अशा मुलांना ‘केजी टू पीजी’ पर्यंतचे मोफत शिक्षण देण्याचा निर्णय संस्थेने नुकताच घेतला आहे.

See also  होम क्वारंटाईन नागरिकांसाठी घरपोच सेवेचे अभियान सुरु : सनी निम्हण यांचा अभिनव उपक्रम