शहरातील खासगी कोव्हिड केअर सेंटरचे ऑडिट होणार.

0

पुणे :

शहरातील खासगी कोव्हिड केअर सेंटरचे ऑडिट करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. त्यात कोव्हिड केअर सेंटरच्या जागेची मालकी, विविध विभागांची परवानगी, रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची प्रमाणपत्रे तपासण्यात येणार आहेत. कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्यासाठी महापालिकेने घालून दिलेल्या नियमांचे पालन होत आहे ना, याची खात्रीही केली जाणार आहे.

‘शहराच्या पाचही परिमंडळातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना हे काम दिले आहे. हे अधिकारी प्रत्येक कोव्हिड सेंटरची पाहणी करून त्याचा अहवाल सादर करणार आहेत,’ अशी माहिती महापालिकेच्या सहायक आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा नाईक यांनी दिली.

खासगी कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्यासाठी महापालिकेने विविध अटी-शर्ती घालून दिल्या आहेत. त्यांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने हे ‘ऑडिट’ केले जाणार आहे. त्यात कोव्हिड केअर सेंटरच्या जागेची मालकी, जागा भाडेतत्त्वावर असल्यास नोंदणीकृत भाडेकरार, सेंटरच्या इमारतीचे बांधकाम विभागाने दिलेले भोगवटा पत्र, हॉटेल, लॉज, वसतिगृहात सेंटर असल्यास ते चालवण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाची परवानगी, अग्निशमन दलाचे ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी), पोलिसांचे ‘एनओसी’ अशा विविध कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे.

खासगी कोव्हिड केअर सेंटरचे ऑडिट करताना या सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार कसे केले जातात, याचीही तपासणी केली जाणार आहे. रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे वैद्यकीय शिक्षण प्रमाणपत्र आणि संबंधित कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्रही तपासण्यात येणार आहे.

– डॉ. मनीषा नाईक,

सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका

खाटांबाबत संपर्क :

करोनाबाधितांना तातडीने खाटा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने स्थापन केलेल्या खाटा व्यवस्थापन वॉर रूमचा ०२०-२५५०२११० हा क्रमांक बीएसएनएलच्या तांत्रिक अडचणींमुळे बंद आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये; म्हणून ०२०-६७८०१५०० या पर्यायी क्रमांकाची व्यवस्था करण्यात आली आहे.

See also  पुणे महापालिकेचे कोविड लासिकरण साठी टास्क फोर्स मार्फत नियोजन.