रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या आरोपींना अटक.

0

पुणे :

रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार करून जास्त दराने विकणाऱ्या ५ आरोपींना गुन्हे शाखा युनिट-४च्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून एकूण ४ रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या बॉटल्स जप्त करण्यात आल्या आहेत. पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १४ एप्रिलला गुन्हे शाखा युनिट -४ कडील पोलीस अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार रमजान शेख यांना वाघोली परिसरात रोहिदास गोरे नावाची व्यक्ती रेमडेसिव्हीर हे इंजेक्शन काळाबाजार करून १०,०००/- रु.ला एक बाटली इतक्या जास्त दराने विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनचे औषध निरीक्षक यांच्या मदतीने युनिट-४ कडील पोलिसांनी बनावट ग्राहक त्या ठिकाणी पाठविले.

तिथे आरोपी रोहिदास बनाजी गोरे (रा. गोरेवस्ती, वाघोली) याच्याकडे काळ्या बाजाराने विक्री करण्यासाठी दोन रेमडेसिव्हीर इंजेक्शन सापडल्याने पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याबाबत औषध निरीक्षक सौ. श्रुतीका जाधव यांनी तक्रार दाखल केल्याने त्याच्याविरुद्ध लोणीकंद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या कारवाईत गुन्हे शाखा युनिट-४ कडील पोलीस हवालदार रुपेश वाघमारे यांना नगररोडजवळील डिमेलो पेट्रोलपंप येथे रेमडेसिव्हीर इंजेक्शनची १८,०००/- रु.स एक बाटली इतक्या जास्त दराने विक्री होत असल्याची बातमी मिळाली. त्यानुसार बनावट ग्राहक पाठविले असता आरोपी मोहम्मद मेहबूब पठाण (वय-२८ वर्षे, रा. शालीमार चौक, दौंड) व त्याचे साथीदार आरोपी इम्तीयाज युसुफ अजमेरी (वय-५२ वर्षे, रा. सुखारे वस्ती, खराडी, चंदननगर) परवेज मैनोद्दीन शेख (वय-३६ वर्षे, रा. तुकाईनगर, दौंड) अश्विन विजय सोळंकी (वय-४१ वर्षे, रा. वांबुरे बिल्डींग, येरवडा) यांच्याजवळ for use of GOVT. Of Maharashtra Not for sale असे लिहिलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या दोन बॉटल्स सापडल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. ही इंजेक्शने शासकीय रुग्णालयांना शासनाने पुरवठा केलेली असून आरोपींनी ती दौंड येथून जास्त किमतीने विक्री करण्यासाठी मिळविली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यातील चार आरोपींना अटक केली असून आणखी आरोपी या रॅकेटमध्ये सहभागी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्यांच्याविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक दिनेश खिवंसरा यांनी तक्रार दिली असून त्यानुसार चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

See also  आंबिल ओढा झोपडपट्टी भागातील घरे पाडण्याच्या कारवाईला स्थगिती

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या यांच्या आदेशाने गुन्हे शाखेचे मा. पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उप आयुक्त श्रीनिवास घाडगे, गुन्हे-२ चे सहा. पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाख युनिट-४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल व युनिट कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.