राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे : टास्क फोर्स सदस्य

0

राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे, असं टास्क फोर्सच्या सदस्यांचं मत असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कोव्हिड टास्क फोर्स समिती यांच्यात आज (11 एप्रिल) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थितीसंदर्भात चर्चा झाली.

या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राजेश टोपे म्हणाले, “राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती आता निर्माण होतीये, तर लॉकडाऊनच्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं, लोकांचे जे काही प्रश्न असतील ते कसे सोडवायचे, लॉकडाऊन लावायचा झाल्यास किती दिवसांचा लावायचा या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली.” राजेश टोपे यांनी पुढे सांगितलं की, “या सगळ्यावर अर्थात केवळ चर्चाच झाली आहे.

पण राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे, असं टास्क फोर्सच्या सदस्यांचं मत होतं. त्यामुळे आता मुख्यमंत्री अर्थ आणि अन्य विभागांशी चर्चा करतील. त्यानंतर कॅबिनेट बोलावली जाईल आणि कदाचित 14 एप्रिलनंतर यासंदर्भातला उचित निर्णय घेतला जाईल.”

“कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील. आपल्याला प्रथम जीव वाचविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही जर आरोग्याची आणीबाणी असेल तर प्राधान्य हे नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवाला असले पाहिजे,” अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारच्या बैठकीनंतर मांडली.

या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. अविनाश सुपे, डॉ तात्याराव लहाने, आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरव विजय अपस्थित होते.

See also  राज्यातील २८ वर्षापर्यंतच्या अनाथांना बीपीएल शिधापत्रिका : छगन भुजबळ