पाषाण येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (एनसीएल) पीएच.डी करणाऱ्या तरुणाचा समलिंगी संबंधातून खून झाल्याचा उलगडा.

0

पुणे –

राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (एनसीएल) पीएच.डी करणाऱ्या तरुणाचा समलिंगी संबंधातून खून झाल्याचा उलगडा झाला आहे. एका डेटींग ऍपवर झालेल्या ओळखीतून इंटेरीअर डेकोरेटर असलेल्या आरोपीने हा खून केला. पीएचडी धारक तरुणाचा विवाह ठरल्याने तो आपल्याला सोडून जाईल अशी भिती निर्माण झाल्याने आरोपीने हे कृत्य केले. खून केल्यानंतर आरोपीने घरी स्वत:चा गळा चिरुन व झोपेच्या गोळ्या घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.

रविराज राजकुमार क्षिरसागर(24,रा.औंढा, हिंगोली, सध्या वारजे) असे आरोपीचे नाव आहे. तर सुदर्शन उर्फ बाल्या बाबुराव पंडीत (30 , सध्या रा. शिवनगर, सुतारवाडी, पाषाण, मूळ रा. जानेफळ, जाफराबाद, जि.जालना) असे खून झालेल्याचे नाव आहे.

पंडीत राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत पीएच.डीसाठी आला होता. सुतारवाडी भागात तो पेईंग गेस्ट म्हणून राहत होता. ‘शीमेल’ डेटिंग साईटच्या माध्यमातून रविराज आणि सुदर्शन यांची सात ते आठ महिण्यापुर्वी ओळख झाली होती. रविराज हा इंटेरिअर डिझायनर असून विवाहित आहे. त्याच्या पत्नीने डिव्होर्ससाठी न्यायालयात दावा केला आहे. तर सुदर्शनचा नुकताच विवाह ठरला होता.

सुदर्शनचा विवाह ठरल्याने तो आपल्याला सोडून जाईल अशी भिती रविराजला होती. यामुळे पंधरा दिवसांपासून त्यांच्यात वाद निर्माण झाले होते.. दरम्यान आरोपी रविराजने सुदर्शनला शुक्रवारी रात्री सुसखिंड पाषाण येथे बोलावून घेतले. तेथे त्यांच्यात वादावादी झाल्यावर रविराजने धारदार शस्त्राने सुदर्शनचा गळा चिरला. यानंतर ओळख पटू नये यासाठी त्याचा चेहरा दगडाने ठेचला. चतुश्रृंगी पोलिसांना खबर मिळाली तेव्हा. सुदर्शनचा मृतदेह नग्नावस्थेत होता.

ही कारवाई पोलीस उपायुक्त पंकज देशमुख , सहायक पोलीस आयुक्त रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, उपनिरीक्षक मोहनदास जाधव व महेश भोसले यांच्या पथकाने केली.

पाकिटावरुन तपासाला मिळाली दिशा

पोलिसांना सुदर्शनचा मृतदेह नग्नावस्थेत मिळाल्याने ओळख पटवणे अशक्‍य होते. मात्र थोड्याच अंतरावर पोलिसांना एक पाकिट सापडले. त्यामध्ये सुदर्शनचे ओळखपत्र होते. सुदर्शनची ओळख पटल्याने तपासाला गती मिळाली. त्याच्या रुममेटकडे केलेल्या तपासात एक बायकी आवाज असलेला तरुण त्याला भेटायला आल्याची माहिती मिळाली. तसेच तांत्रीक तपासावरुन तो सातत्याने रविराजच्या संपर्कात असल्याचे कळाले.

See also  पुणे पोलिस आयुक्तालयात लवकरच सहा नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती. बाणेर मध्ये होणारा पोलीस ठाणे. 

यानंतर पोलिसांनी रविराजचे घर गाठले, मात्र तेथे त्याच्या आईवडिलांनी रविराजने आत्महत्या करण्याचा प्रत्यत्न केल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले. पोलिसांनी रविराजची रुग्णालयात जाऊन चौकशी केली असता, त्याने गुन्हयाची कबुली दिली. पोलिसांना चकवा देण्यासाठी रविराजने पत्नीशी पटत नसल्याने आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली होती.