महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता अजय देवगण बारामतीत !

0

बारामती:

महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता अजय देवगण हे दोघेही आज सकाळी अचानक बारामती विमानतळावर लँड झाले. दुपारपर्यंत दोघेही तिथे होते. त्यांच्या येण्याची कोणालाही कानोकान खबर लागली नव्हती. चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने ते येथे आले होते, मात्र ते जेव्हा माघारी परतले, तेव्हा अनेक चर्चांना उधाण आलं. अमिताभ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेटण्यासाठी बारामतीत आले होते, अशी कुजबूजही बारामतीत झाली, पण त्यात काहीच तथ्य नव्हतं.

बारामती विमानतळावर अजय देवगण आणि अमिताभ बच्चन हे सकाळी दहा वाजताच्या सुमारास खासगी विमानाने आले. त्या ठिकाणी त्यांचे काही काळ चित्रीकरण झाले. अजय देवगणच्या आगामी ‘मेडे’ या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन आणि अजय देवगण एकत्र भूमिका साकारत आहेत. “मेजरसाब’ ‘खाकी’ आणि ‘सत्याग्रह’ या चित्रपटांनंतर अजय देवगण आणि अमिताभ बच्चन ‘मेडे’त एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटामध्ये अजय देवगण हा वैमानिकाची भूमिका साकारत असून हा थरारपट आहे. यामध्ये अमिताभ बच्चन हेसुद्धा प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाचा काही भाग आज बारामती विमानतळावर शूट करण्यात आला.

महानायक बच्चन आणि अभिनेता देवगण यांचा चित्रीकरणासाठीचा दौरा गोपनीय असल्याचे सुत्रांनी सांगितले. या दोघांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार,उद्योजक रणजित पवार,त्यांच्या पत्नी शुभांगी पवार यांनी स्वागत केले. यावेळी सुनेत्रा पवार यांनी बच्चन आणि देवगण यांच्याशी संवाद साधला. दरम्यान, येथील विमानतळावर दुपारी दोन वाजेपर्यंत बच्चन आणि देवगण उपस्थित होते.त्यानंतर ते दोघे मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

See also  ग्रामपंचायत निवडणुकीत नवीन नियमामुळे इच्छुक अडचणीत.