मंडईतील मेट्रो स्टेशनच्या कामाला लवकरच सुरुवात होणार

0

पुणे :

पुणे मेट्रोच्या भुयारी स्टेशनपैकी चार स्टेशनची कामे वेगाने पुढे सरकत असताना, अनेक महिन्यांपासून जागा मिळत नसल्याने प्रलंबित राहिलेल्या मंडईतील मेट्रो स्टेशनच्या कामाला अखेर लवकरच सुरुवात होणार आहे. जुन्या झुणका भाकर केंद्राच्या परिसरातून शिवाजी रस्त्याकडे जाणारा सर्व परिसर बंदिस्त केला गेला असून, येत्या आठवड्यात स्टेशनच्या कामासाठी खोदकाम आणि पायलिंगचे काम केले जाणार असल्याचे महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशने स्पष्ट केले.

पिंपरी ते स्वारगेट या मार्गावर शिवाजीनगर, धान्य गोदाम, कसबा पेठ आणि स्वारगेट या चार भुयारी स्टेशनसाठी खोदकाम गेल्या वर्षीच सुरू झाले आहे. शिवाजीनगर आणि सिव्हिल कोर्ट येथील बहुतांश खोदकाम पूर्ण झाले असून, स्टेशनच्या दृष्टीने पुढील बांधकामांना सुरुवात झाली आहे. परंतु, या मार्गावरील पाचव्या आणि सर्वांत महत्त्वाच्या मंडई स्टेशनच्या कामाला बऱ्याच महिन्यांपासून मुहूर्त मिळत नव्हता. त्यासाठी झुणका भाकर केंद्राची जागा ताब्यात मिळाली असली, तरी इतर जागांच्या ताब्याची प्रक्रिया रखडली होती; तसेच स्थानिक विक्रेत्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित राहिला होता.

लंके वाडा आणि आजूबाजूची जागा मिळविण्यासाठी महामेट्रो आणि महापालिका यांच्यात सातत्याने झालेल्या चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर अखेर येथील समस्या दूर झाली. लंके वाड्यातील भाडेकरूंची पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येथील विक्रेत्यांना यशवंतराव चव्हाण पुतळ्यासमोरील पर्यायी जागा देण्यात आली आहे. त्यामुळे महामेट्रोने येथील सर्व परिसरात बॅरिकेडिंग लावून रस्ता बंद केला आहे. पुढील काही दिवसांत आवश्यक यंत्रसामग्री या ठिकाणी पोहाचताच खोदकाम आणि पायलिंगचे काम सुरू केले जाणार असल्याची माहिती महामेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

 

See also  नितीन गडकरी यांच्या हस्ते कात्रज येथे महामार्ग प्रकल्पांचा भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन