लस घेतल्यानंतरही तब्बल  १९ जणांना कोरोनाची लागण

0

अमरावती :

अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर भारतात काही दिवसांपूर्वी कोरोना लसीकरण सुरू झालं. कोरोनाची लस घेतल्यामुळे या व्हायरसची लागण होण्याचा धोका टळेल, असा समज बहुतांश नागरिकांचा होतो. मात्र हाच समज खोडून काढणारी आकडेवारी अमरावती जिल्ह्यातून समोर आली आहे. लस घेतल्यानंतरही तब्बल १९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या माहितीवर आरोग्य यंत्रणेकडूनही शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

कोरोनाविरोधातील लढाईत अग्रभागी असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिल्या टप्प्यात कोरोनाची लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. याअंतर्गत अमरावतीतही १० हजार ८७४ जणांना या लशीचा पहिला डोस देण्यात आला आहे. महिनाभरानंतर या सर्वांना कोरोना लशीचा दुसरा डोसही देण्यात येण्यार आहे. मात्र त्याआधीच एक धक्कादायक बाब समोर आली आहे. लस घेतलेले १९ जण आता कोरोनाबाधित आढळले आहेत.

लसीकरणानंतरही कसा झाला कोरोना?

कोरोनाची लस घेतल्यानंतर शरीरात अ‍ॅण्टीबॉडी तयार होतात. मात्र ही लस घेतल्यानंतरही एक ते दीड महिना कोरोनाची लागण होण्याचा धोका असतो. त्यामुळे तोपर्यंत कोरोनापासून वाचण्यासाठी काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचं वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.

कोराेनाने केंद्र बदलले
ज्या कोरोनाचा प्रादुर्भाव याआधी मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये जास्त होता, त्या कोरोनाने आता आपलं केंद्र बदलल्याचं दिसत आहे. कारण अमरावती जिल्ह्यात गेल्या दहा दिवसापासून कोरोना रुग्णांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. १ फेब्रुवारी रोजी हे प्रमाण २२ टक्के होतं तर आता सोमवारी ज्या ४१९ लोकांच्या चाचण्या घेण्यात आल्या त्यापैकी २३५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे हे प्रमाण ५६ टक्क्यांवर गेलं आहे. शहरातील नागरिक कोरोना नियमाचे कुठेही पालन करताना दिसत नाही.

या पार्श्वूमीवर जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्य विभागाचे अधिकारी व जिल्ह्यातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.

See also  दिवेआगरच्या समुद्रकिनारी डॉल्फिनचा स्वच्छन्द वावर